मागील ८ ते १० दिवसांपासून उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी सुरू आहे. थंडीचा प्रकोप वाढला आहे. बोचऱ्या थंडीपासून स्वतचा बचाव करण्यासाठी ऊबदार कपडे खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे.
मागील सलग दोन वर्षांत अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्ह्याला दोन्ही वर्षांतील हिवाळ्याच्या ऋतूमध्ये कडाक्याच्या थंडीचा अनुभव आला नव्हता. परंतु यंदाच्या झालेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. जिल्ह्य़ातील बहुतांश भागात मध्यम, लघु प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे. तसेच अनेक ठिकाणचे साठवण, पाझर तलावही भरले असून, अद्याप जिल्ह्याच्या काही भागातील नद्या वाहताना दिसतात. परिणामी यंदा हिवाळ्यात बोचऱ्या थंडीचा चांगलाच अनुभव येत आहे.
डिसेंबर महिना उजाडताच जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस घसरत गेले. तापमान मोठय़ा प्रमाणात घसरल्याने सबंध जिल्हाभरात थंडीचा कडाका वाढला आहे. १ डिसेंबर रोजी किमान तापमान १७.३ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. आज ते  १०.२ एवढे खाली आले आहे. परिणामी दररोज ऊबदार कपडय़ांच्या विक्रीची उलाढाल पाऊण लाखांच्या घरात गेली आहे.
आबालवृद्धांना हुडहुडी भरविणाऱ्या या थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊबदार कपडे खरेदी करण्याकडे नागरिकांचा दिवसेंदिवस कल वाढत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक निरनिराळे उपाय शोधू लागले आहेत. उस्मानाबाद येथील बाजारपेठेत तिबेट, नेपाळ आदी ठिकाणचे विक्रेते ऊबदार कपडे घेऊन दाखल झाले आहेत. येथील बाजारपेठेत मफलरची किंमत १५० रुपयांपासून १८० रुपयांपर्यंत आहे. स्वेटर (महिला व पुरुष) ३५० ते ८०० रुपये, जॉकीट ६५० ते १८०० रुपये, कानटोपी ६० रुपयांपासून १०० रुपये किंमतीस उपलब्ध आहे. लहान मुलांचे स्वेटर १६० पासून ४०० रुपयेपर्यंत उपलब्ध असल्याचे नेपाळी विक्रेते अन्नू यांनी सांगितले. हिमाचल प्रदेशातून ग्राहकांच्या पसंतीस उतरणारा माल विक्रीस उपलब्ध करण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका वाढल्याने रात्रीच्या वेळेस व पहाटे शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा