उद्योगांना कच्चा माल स्वस्त मिळावा म्हणून सरकार शेतमालाचे भाव पाडते. त्यावर शेतकरी संघटना एकत्र येऊन लढायला लागल्या की राज्यकर्ते तोडा, फोडा व झोडा नितीचा वापर करतात, असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला.
ऊस भावाच्या आंदोलनात शरद जोशी, खा. राजू शेट्टी व पाटील यांच्या नेतृत्वाखालील तीनही संघटना एकत्र आल्या होत्या. आंदोलनाचे नेतृत्व जोशी यांनी पाटील यांच्याकडे दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मृती यात्रा काढण्यात आली आहे. यात्रेचे काल शहरात आगमन झाले. आझाद मैदानात झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉ. अण्णासाहेब थोरात होते. पाटील पुढे म्हणाले, सर्व शेतकरी संघटना शरद जोशी यांच्या विचारांच्या मांडणीवर चालतात. साऱ्याच नेत्यांना हे मान्य आहे. महात्मा फुले यांच्यानंतर शंभर वर्षांनी शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या हातात आसूड दिला. जोशी हे संघटनेचे विद्यापीठ आहे. पण, काही राजकीय आणि आंदोलनाच्या मुद्दय़ावर मतभेद असल्याने संघटना स्वतंत्र लढतात. आपल्या मागण्यांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांवर सरकार गोळ्या घालायला निघाले. म्हणून सांगलीला सारे एकत्र आले. जोशी यांनी आपल्यावर आंदोलनाच्या नेतृत्वाची जबाबदारी टाकली. राज्यकर्त्यांच्या पोटात त्यामुळे दुखायला लागले असून संघटनेत फूट पाडण्याचा उद्योग त्यांनी चालविला आहे, असा आरोप पाटील यांनी केला.
पूर्वी राजे-रजवाडे शेतकऱ्यांना लुटायचे, आपले खजिने भरायचे. पद्मनाभन मंदिराचा खजिना हे त्याचे उदाहरण आहे. आता राज्यकर्ते लुटायला लागले आहेत. साखर उद्योगात परवडत नाही असे म्हणणारे मंत्री, पुढारी व साखर सम्राट हे खासगी कारखाने काढत आहेत. देशाबाहेरही त्यांनी संपत्ती जमा केली आहे. उद्योगांना कच्चा माल स्वस्त दरात उपलब्ध व्हावा म्हणून राज्यकर्ते शेतमालाचे भाव पाडतात, उद्योगपतींच्या इशाऱ्यावर नाचतात, गडगंज पैसा कमावतात. त्यात शेतकरी भरडला जातो. शेतकऱ्यांसारखी पुढाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ का येत नाही? याचे उत्तर त्यामध्ये आहे, असेही पाटील म्हणाले.
संघटनेचे नेते कालिदास आपेट यांनी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे हे स्वामीनाथन समितीच्या अहवालावर बोलत नाहीत. त्यांच्या पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी व मनमोहनसिंग यांच्याकडे अहवालाच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करत नाहीत, त्यामुळे विखे यांना ही संघटना धडा शिकवील, असा इशारा त्यांनी दिला. संघटनेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण वडले यांनी शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांना दिसेल तिथे बडवा, त्यातून मंत्री, आमदार-खासदार व साखर सम्राटांना सोडू नका, तुरूंग भरा, पण बडविण्याचे आंदोलन चालू ठेवा, तरच शेतकऱ्याला न्याय मिळेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी अनिल धनवट, शंकर गोडसे, विठ्ठलराव शेळके, अण्णासाहेब थोरात, तालुकाध्यक्ष जितेंद्र भोसले, शिवाजीनाना नांदखिले आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक बाळासाहेब पटारे यांनी केले.     

Story img Loader