गतवर्षीच्या कटू अनुभवामुळे यंत्रमागधारकांचे आर्थिक कंबरडे मोडले होते. दिवाळीनंतर सुरू झालेल्या नव्या आर्थिक वर्षांकडे तो मोठय़ा आशेने गेले महिनाभर पाहत असताना इथेही ‘प्रथमग्रासे मक्षिकापात’ अशी अवस्था झाल्याने त्यांच्यातील अस्वस्थता वाढीस लागली आहे.
कामगारांचा प्रदीर्घकाळचा संप, मजुरीत झालेली लक्षणीय वाढ, वीज दरवाढ, मंदी या संकटांमुळे गेले आर्थिक वर्ष यंत्रमागधारकांना अभूतपूर्व त्रासदायक गेले. दीपावली पाडव्याचे सौदे यथातथा पार पडले. यंदा दिवाळीनंतर पाच दिवस यंत्रमाग वीज दरवाढीमुळे बंद राहिले. अशातच कापडाला मागणी नसल्याने नव्या वर्षांबद्दल यंत्रमागधारकांना चिंता वाटू लागली आहे. तर कामगार संघटनांनी महागाई निर्देशांकाप्रमाणे मजुरीवाढ होण्यासाठी जानेवारी महिन्यात आंदोलनाला हात घालण्याच्या हालचाली सुरू केल्याने हे आव्हान कसे पार पाडायचे याची धास्तीही जाणवत आहे.
यंत्रमाग क्षेत्रामध्ये दोन प्रकारचे आर्थिक वर्ष असते. बँकांच्या हिशोबाप्रमाणे एप्रिल ते मार्च असा आर्थिक व्यवहार केला जातो. तर दुसरीकडे दीपावली पाडवा ते दीपावली अशा दुसऱ्या आर्थिक वर्षांची नोंद चोपडय़ांमध्ये बंदिस्त झालेली असते. यंदाच्या दीपावली पाडव्याचे चोपडा पूजन करताना यंत्रमागधारक, कापड व्यापारी, सूत व्यापारी या साऱ्या घटकांनी आगामी वर्षतरी सुखकारक जाऊ दे, अशी मनोमन प्रार्थना केली. गतवर्षांतील कटू अनुभवांचे स्मरण करीत यापुढे अशी आपत्ती येऊ नये असा धावा केला जात होता.
मागील वर्षांमध्ये वस्त्रोद्योगामध्ये संकटाची मालिकाच सुरू होती. कामगारांचा मजुरीवाढीचा प्रदीर्घ लढा हा लक्ष्यवेधी ठरला होता. तब्बल ४० दिवस कामगारांनी कामबंदचा यल्गार पुकारला होता. अखेर त्यांना तब्बल ४८ टक्के इतकी मजुरीवाढ दिल्यानंतर आंदोलनावर पडदा पडला. या आंदोलनामुळे यंत्रमागधारकांसह एकूण उद्योग विचलित झाला. अशातच मंदीमुळे कापडाला मागणी नसल्याने आर्थिक गणिते चुकत गेली. वीज दरवाढीची झळ बसल्याने जीर्ण झोळी आणखीनच फाटकी बनली. या समस्यांमुळे यंत्रमागधारक हबकून गेला होता.
दिवाळीनंतरच्या नव्या वर्षांकडे आता तो मोठय़ा अपेक्षेन पाहत आहे. यंदा तरी सारे काही ठिकठाक व्हावे, अशी अपेक्षा तो बाळगून आहे. पण ठरविल्याप्रमाणे सर्व काही पार पडतेच याची खात्री व्यापार-उद्योगात नसते. त्याची खातरजमाच दीपावली पाडव्याच्या दिवशी आली होती. मुहूर्ताने होणारे सौदे निराशाजनक ठरले. प्रतिवर्षीच्या तुलनेत निम्म्या प्रमाणातही सौदे झाले नसल्याचे मत राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. मंदीचे वातावरण कायम असल्याने सूत व कापड या दोन्ही घटकांची मागणी दिवाळी होऊन महिना लोटला तरी थंडावलीच आहे. शिवाय वीज दरवाढीच्या विरोधात पाच दिवस कारखाने बंद राहिल्याने घडी बसण्यास वेळ लागत आहे. याच प्रश्नासाठी आगामी काळात आणखी किती दिवस बंद ठेवावा लागणार याची बोच यंत्रमागधारकांना लागलेली आहे. यंत्रमागाची रात्रपाळी सुरू होण्याचे तसेच सायझिंग सुरू होण्याचे प्रमाण अद्यापही नगण्य आहे. दिवाळीच्या बोनसबाबत रास्त तडजोड न झाल्याने अजूनही काही सायझिंगमध्ये कामगार जाण्यास तयार नाहीत.
कामगार आंदोलनाच्या हालचाली
कामगारांच्या मजुरीवाढीच्या आंदोलनावेळी महागाई भत्त्याप्रमाणे वर्षांतून दोनदा पगारवाढ करण्याचा मुद्दा करारामध्ये समाविष्ट केला होता. डिसेंबर अखेर पहिला टप्पा पार पडणार आहे. महागाई निर्देशांकात किती वाढ झाली आहे याचा अंदाज जानेवारी महिन्यामध्ये घेतला जाणार असून त्यानंतर कामगारांना निर्देशांक वाढीनुसार मजुरी मिळावी यासाठी लढा द्यावा लागणार असल्याचे मत माकपचे कामगार नेते कॉ.दत्ता माने यांनी व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा