गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगर शहरातील सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना खेमाणी नाल्यामधून उल्हास नदीत सोडण्यात येते. यामुळे नदी प्रदूषित होत असल्याच्या तक्रारी आहेत. कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकांना या नदीतून पाणीपुरवठा केला जातो. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे नदी प्रदूषित करणारा खेमाणी नाला अन्यत्र वळविण्यात यावा, असे आदेश पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाने उल्हासनगर महापालिका प्रशासनाला दिले.
उल्हास नदी प्रदूषणाबाबत वनशक्ती स्वयंसेवी संस्थेने राष्ट्रीय हरित लवादासमोर एक याचिका दाखल केली आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून याबाबत लवादाकडून वेळोवेळी सुनावण्या घेण्यात येत आहेत. महापालिका प्रशासनाकडून लवादाच्या आदेशाची गांभीर्याने दखल घेण्यात येत नसल्याने संतप्त होऊन लवादाने खेमाणी नाल्याचे काय करणार हे स्पष्टीकरण देण्यासाठी महापालिका आयुक्तांना लवादासमोर हजर राहण्याचे आदेश दिले. उल्हासनगर शहरातील सांडपाणी वाहून आणणारा खेमाणी नाला उल्हास नदीला जेथे मिळतो तेथून काही अंतरावर कल्याण डोंबिवली महापालिका, एनआरसीच्या पाणीपुरवठा योजना आहेत. या योजनांमधून शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. दूषित पाणी नाल्यात मिसळत असल्याने ते पाणी पुढे प्रक्रिया करून रहिवाशांपर्यंत पोहचविले जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ही बाब वनशक्तीचे अश्विन अघोर, डी. स्टालीन यांनी लवादाच्या निदर्शनास आणली. खेमाणी नाला वळवण्यासाठी तसेच त्यामधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हे काम लवकर सुरू करण्यात येणार आहे, असे उल्हासनगर महापालिकेतर्फे लवादाला सांगण्यात आले. त्यावर समाधान न झाल्याने लवादाने नाल्यासाठीची २० कोटींची रक्कम कोकण विभागीय आयुक्तांकडे जमा करण्याचे आदेश दिले.  

Story img Loader