जनगणनेच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील सर्वाधिक लोकसंख्या ठरलेल्या ठाणे जिल्ह्य़ाचे जवळपास दशकभराहून अधिक काळ रेंगाळलेले विभाजन आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी नेमलेल्या समितीने नुकताच आपला अहवाल शासनास सादर केला असून त्यात त्रिभाजनाऐवजी विभाजनच करावे, असे प्रस्तावित करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. 
शासकीय कार्यालयांसाठी जागेची उपलब्धता, रेल्वे स्थानक आणि आदिवासी तालुक्यांना जवळचे असल्याने नव्या जिल्हयाचे मुख्यालय पालघर येथे करावे, अशी शिफारस समितीने केल्याचे समजते. सध्या ठाणे जिल्ह्य़ात असणाऱ्या वसई तालुक्याचा समावेश पालघर तालुक्यात होईल. ठाणे जिल्ह्य़ातील अकरा आमदारांनी जिल्हा त्रिभाजनाचा पर्याय सुचवून केलेली कल्याण जिल्हयाची मागणी मात्र समितीने विचारात घेतली नसल्याचे समजते.
जिल्ह्य़ाचे विभाजन व्हावे की त्रिभाजन याबाबत समितीच्या सदस्यांमध्ये दोन मते होती. काही सदस्यांनी तीन जिल्हे व्हावेत, असे मत मांडले होते. नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर या संपूर्ण नागरीकरण झालेल्या भागाचा मुंबई उपनगर जिल्ह्य़ाच्या धर्तीवर ठाणे उपनगर जिल्हा, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी, वाडा, शहापूर, मुरबाड या तालुक्यांचा कल्याण जिल्हा आणि उर्वरित आदिवासी तालुक्यांचा तिसरा जिल्हा करावा, असा एक विचार मांडण्यात आला आहे. कल्याण पट्टय़ातील अकरा आमदारांनी या प्रस्तावास अनुकुलता दाखवून तसे पत्रही दिले होते. त्रिभाजनाचा पर्याय आर्थिक कारणाने मागे पडला असल्याचे सांगण्यात येत असले तरी तो राजकीय डावपेच असल्याचे मानले जात आहे. एक कोटीहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ाचे अजूनही वेगाने नागरीकरण होत आहे. लोकसंख्या वाढीचा हा दर कल्याण पट्टय़ात सर्वाधिक आहे. त्यामुळे आताच कल्याण हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करून त्यास रायगडमधील नेरळ, कर्जत परिसर जोडावा, असे या भागातील जाणकारांचे मत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा