काँग्रेस पक्षाने जनसामान्यांच्या हिताची अनेक विकासकामे केली आहेत. ती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सांगली येथे विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून ताकद पणाला लावण्यात येईल, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी जिल्हा काँग्रेस भवनात आयोजित केलेल्या बैठकीवेळी केले. पक्षांतर्गत संघर्ष थांबवला तर पक्षाची वाढ अधिक गतीने होईल असा सल्लाही त्यांनी गटबाजी करणाऱ्या नेत्यांना दिला.
काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगली येथे विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने जोरदार प्रयत्न केले जात आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मेळाव्यात सहभागी व्हावे असे निवेदन केलेले आहे. त्याचा एक भाग म्हणून रविवारी जिल्हा काँग्रेस भवनात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, माजी आमदार पी. एन. पाटील होते.
पी. एन. पाटील यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले. काँग्रेस पक्ष ही देशाला लागलेली वाळवी आहे अशी टीका मोदी करीत असले तरी जनसंघापासून त्या आजच्या भाजपापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतल्यास हाच पक्ष देशाला वाळवी लागला असल्याचे दिसत आहे. काँग्रेस पक्षाने गेल्या दहा वर्षांत दहा हजार कोटी रु पयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. राज्याचे अंदाजपत्रक दहा हजार कोटीचे असताना व त्यातील निम्मी रक्कम पगारावर खर्च असताना सोमय्या हे बेताल वक्तव्ये करुन आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन घडवत आहेत अशी टीकाही त्यांनी केली. दिखावू प्रकारची आंदोलने करुन शिवसेनेचे नेते उठसुठ सार्वजनिक मालमत्तेची मोडतोड करतात. अशांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी गृह राज्यमंत्री पाटील यांच्याकडे केली. पदासाठी भांडत न राहता सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा आदर्श घेऊन पक्ष संघटन बळकट करावे असे आवाहनही त्यांनी केले.
माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी अंतर्गत वादातून पक्षाचे नुकसान होत असल्याकडे लक्ष वेधून लोकसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यातील जागा ताकदीने लढवून तिरंगा फ़डकवण्याचे आवाहन केले. माजी आमदार संजय घाटगे, महापौर जयश्री सोनवणे, लेमनराव निकम यांची भाषणे झाली. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, अजंना रेडेकर, सरला पाटील, अरुण डोंगळे, माजी आमदार दिनकर जाधव, सुरेश कुराडे, आनंदराव पाटील चुयेकर आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा