आजकाल घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहे, अशी चर्चा नेहमी ऐकू येते. साधारणपणे ‘पटत नाही’ या कारणासाठी घटस्फोट मागितले जातात. परंतु ‘का पटत नाही’ या प्रश्नाचा शोध घेता काही अतक्र्य तथ्ये सामोरी येतात. मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच अशा दोन प्रकरणांमध्ये घटस्फोट मंजूर करण्यास नकार देऊन तकलादू कारणे देत विवाहविच्छेद करू पाहणाऱ्यांना चपराकच लगावली आहे.
प्रतिनिधी, मुंबई
१६ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या पत्नीपासून घटस्फोट मागणाऱ्या, परंतु घटस्फोटाचा अर्ज प्रलंबित असतानाच तिच्यासोबत लैंगिक संबंधही कायम ठेवणाऱ्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. विभक्त होऊनही लैंगिक संबंधांसाठी एकत्र येणाऱ्या दाम्पत्याला घटस्फोट देण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला.
न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामाणी आणि न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने या तऱ्हेवाईक प्रकरणातील पतीचा घटस्फोटासाठीचा अर्ज फेटाळून लावला. ‘सासू-सासऱ्यांविना राहण्यास पत्नी तयार होती. शिवाय लग्न टिकविण्याच्या दृष्टीने ती सतत प्रयत्नशीलही होती. उलट पतीने मात्र स्वतंत्र घर घेऊन वेगळी चूल थाटण्याची तिची मागणी कधीच पूर्ण केली नाही. वर ती लग्न टिकविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे हेरून त्याने विभक्त झाल्यावरही तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. पतीने यापूर्वीही घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्या वेळी आणि सध्याचा घटस्फोटासाठीचा अर्ज प्रलंबित असताना दोघेही लैंगिक सुखाचा वेळोवेळी आनंद उपभोगत होते’ असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे.
फेब्रुवारी १९९७ मध्ये विवाह झाल्यानंतर एक वर्षच दोघेही एकत्र राहिले. त्यानंतर पत्नी आईवडिलांच्या घरी निघून गेली. लग्नाला एक वर्ष होत नाही तोच पत्नी घर सोडून गेल्याचे सांगत आणि हा मानसिक छळ असल्याचा दावा करीत २००० मध्ये पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तो २००२ मध्ये कुटुंब न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर त्याने २००९ मध्ये नव्याने घटस्फोटासाठी अर्ज केला. तोही कुटंब न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सासू आणि नणंद आपल्याला चांगली वागणूक देत नसल्याचा आणि घर सोडून जाण्यासाठी आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप करीत पत्नीने पतीच्या सर्व आरोपांचे खंडन केले. आपल्याला घटस्फोट घ्यायचा नाही. त्यासाठीच आपण पतीकडे घर घेऊन वेगळी चूल मांडण्याची मागणी केली होती, असे म्हणणे पत्नीने मांडले.
विभक्त राहात असतानाही पतीने आपल्याला आपण त्याच्यासोबत लैंगिक संबंध कायम ठेवले नाही तर ‘इतरत्र’ जाऊ, असे धमकावले. पतीला कुठला ‘जीवघेणा रोग’ होऊ नये म्हणून आपण त्याची म्हणणे मान्य केले. ही वस्तुस्थिती दोन्ही कुटुंबियांना माहीत होती, ही माहितीही तिने न्यायालयाला दिली. तिचा युक्तिवाद ग्राह्य धरूत न्यायालयाने पतीचा अर्ज फेटाळून लावला.

‘पत्नी शर्ट-पॅण्ट घालते  म्हणून घटस्फोट मिळणार नाही’
कामावर जाताना पत्नीने शर्ट-पॅण्ट परिधान करून जाणे, रात्री उशिरा घरी परतणे अथवा लग्नानंतर महिन्याने कामानिमित्त बाहेर जाणे आदी प्रकार मानसिक छळवणूक असू शकत नाहीत, असा निर्वाळा देत यासाठी खालच्या न्यायलयाने मंजूर केलेला घटस्फोट मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला. सुखदु:खांतूनच संसाराचा गाडा पुढे सरकत असतो. संसारात नवरा-बायकोमध्ये छोटी-मोठी भांडणे होतच असतात. असा प्रत्येक मुद्दा मानसिक छळाच्या चौकटीत बसवून त्याआधारे घटस्फोट मागता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
आपण मधुचंद्रासाठी महाबळेश्वरला गेलो असताना पत्नीने जवळ येऊ दिले नाही. लग्नानंतर लगेचच ती कामानिमित्त नाशिकला निघून गेली. तसेच कामावर जाताना ती शर्ट-पॅण्ट घालते, अशी कारणे देत असे वागणे म्हणजे मानसिक क्रौर्यच असल्याचा अजब दावा पतीने केला होता. मात्र पत्नीने या सर्व आरोपांचे मुद्देसूद खंडन केले. मधुचंद्राला जाताना आपली ‘मासिक पाळी’ सुरू होती. तसेच लग्नासाठी सुमारे दीड महिना रजा घेतल्यानंतर ठरल्या दिवशी कामावर हजर राहणे आवश्यकच होते. आणि शर्ट व पॅण्टमध्ये वावरणे सोयीचे ठरते, अशी बाजू पत्नीने मांडली. पत्नीची बाजू मान्य करीत न्यायालयाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज फेटाळून लावला.