ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून दीपावली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात जिल्ह्य़ातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्री तसेच प्रदर्शनाकरिता दालन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अशोक पोहेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. येत्या ७ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ठाणे येथील गावदेवी मैदानामध्ये हा महोत्सव होणार असून यामध्ये जिल्ह्य़ातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन तसेच विक्रीचे सुमारे ८० स्टॉल लावण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्या हस्ते या स्टॉलचे उद्घाटन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. महोत्सवातील स्टॉलमध्ये दिवाळी फराळ, रांगोळ्या, पणत्या, तोरण, आकाश कंदिल, विविध प्रकारचे सरबत, सॉस, मसाले, वारली पेंटींग, होममेड चॉकलेस्, पापड, लोणचे, बांबूच्या कलात्मक वस्तू, बॅग्ज-पर्सेस, सोलापुरी चादरी, कृत्रिम फुले, पेपर बॅग, किचन वेअर, निरगुडीचे औषधी तेल, कॉस्मेटिक्स, तागाच्या वस्तू, पैठणी साडय़ा, आदी स्टॉल समावेश असणार आहे. तसेच येथे आगरी खाद्य पदार्थाचे स्टॉल लावण्यात येणार असल्याने त्याचा आस्वाद ठाणेकरांना घेता येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali celebration in thane district bank