तेजाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपोत्सवास धनत्रयोदशी आणि गाय-वासरू पूजन अर्थात वसुबारसने उत्साहात सुरुवात झाली असून आकर्षक रोषणाई, पणत्यांची आरास, आकाशकंदील यांच्या लखलखाटाने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया अवरतल्याचे पाहावयास मिळत आहे. दीपावलीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणून गणल्या जाणाऱ्या लक्ष्मीपूजनच्या पूर्वसंध्येला बाजारपेठांमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून आला. प्रमुख बाजारपेठांमध्ये केरसुणी, पणत्या व फुल विक्रेत्यांचे साम्राज्य पसरले आहे. लक्ष्मीपूजनासाठी व्यापाऱ्यांनीही विशेष तयारी केल्याचे पाहावयास मिळाले.
लक्ष्मीपूजन म्हणजे यंदा दिवाळीचा तिसरा दिवस. नरक चतुर्दशीही यंदा त्याच दिवशी आली आहे. काही दिवसांपासून गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या बाजारपेठांमधील स्थिती अद्याप ‘जैसे थे’ आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत त्यात तसूभरही कमतरता आलेली नाही. उलट लक्ष्मीपूजनसाठी खरेदीला अक्षरश: उधाण आले. या दिवशी खतावण्या व चोपडय़ांसह धनाची पूजा करताना व्यापारी व व्यावसायिकांमार्फत आपली दुकाने व कार्यालये फुलांनी सुशोभित करण्यावर प्रामुख्याने भर दिला गेला. सर्वसामान्यांकडूनही फुलांना असणारी मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी खास दिवाळीसाठी शेतात राखलेल्या फुलांचे सोमवार सकाळपासून नाशिकच्या बाजारात आगमन होऊ लागले. सकाळी फुलांचे दर ६० ते ६५ रुपये प्रति शेकडा इतके असले तरी आवक वाढू लागल्यावर दर ४५ ते ५० रुपयांपर्यंत खाली आले. फुलांबरोबर केरसुणी खरेदी करण्यासाठी गर्दी उसळली होती. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घराघरांत केरसुणीला लक्ष्मीच्या स्वरूपात पुजले जाते. याशिवाय खरेदीसाठी लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त साधण्याचा अनेकांचा प्रयत्न होता. सराफ बाजार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन दुकानांमध्ये नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात आगाऊ नोंदणी करून नियोजित मुहूर्ताला वस्तूरूपी लक्ष्मी घरी आणण्याचे नियोजन केल्याचे दिसून आले.
फटाक्यांमुळे ध्वनी व हवेतील प्रदूषणाबाबत कितीही ओरड होत असली तरी खरेदीच्या उत्साहाला कोणताही ‘ब्रेक’ लागलेला नाही. शहरातील डोंगरे वसतिगृह मैदानावरील नाशिक जिल्हा फटाका असोसिएशनच्या सर्वच स्टॉलवर खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. फ्लॉवरपॉट, भूईचक्र, रॉकेट, लेस अशा पारंपरिक प्रकारांसोबत चिनी माल खरेदीकडेही अनेकांचा कल आहे. त्यात सिग्नल लाइट, कलर फ्लॅश, माइन ऑफ क्रॅकर्स, व्हिसल व्हिज, ट्रिपल फन, एके ४७, ब्रेक डान्स, पिकॉक डान्स, ओह ला लाल अशा विविध फॅन्सी प्रकारांचा समावेश आहे. आवाजाच्या फटाक्यांपेक्षा फॅन्सी प्रकारच्या फटाक्यांना अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. व्यापारी वर्गाचा कल माळा खरेदीकडे राहिल्याने एक हजारापासून ते १० हजारांपर्यंतच्या माळांची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली.
महागाईची काहीशी ओरड असली तरी खरेदीवर त्याचा कोणताच परिणाम न झाल्याने व्यावसायिकांनी ही दिवाळी आनंदाची, सुख व समाधानाची जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लक्ष्मीपूजन व भाऊबीजेच्या पाश्र्वभूमीवर, बाजारपेठांमधील खरेदीचा माहौल कायम आहे.   
रात्री पावणेनऊपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त
मंगळवारी सूर्यग्रहण असले तरी ते भारतात दिसणार नसल्याने लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्ताशी त्याचा कोणताही संबंध राहणार नसल्याची माहिती गंगा-गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी दिली. मंगळवारी चार वेगवेगळे मुहूर्त असून या कालावधीत लक्ष्मीपूजन करता येईल. त्यात सकाळी ९.४५ ते ११.०० – चंचल, सकाळी १०.५८ ते १.५८ – लाभ व अमृत, दुपारी ३.०८ ते ४.३८ शुभ आणि सायंकाळी ७.२३ ते ८.५३ वाजेपर्यंत – लाभ असे मुहूर्त आहेत. उत्तरेकडील राज्यात सकाळच्या मुहूर्तास महत्त्व दिले जाते, परंतु महाराष्ट्रात सायंकाळच्या मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करण्यास प्राधान्य दिले जाते, असेही शुक्ल यांनी सांगितले.

Story img Loader