हर्षोल्हास, मंगलमय, तेजोमय तसेच काही गोड काही तिखट, अशा वैविध्यपूर्ण फराळांमुळे आरोग्यमय, असे वर्णन करण्यात येणाऱ्या दीपावलीत मुलांना सर्वाधिक आवडणारी गोष्ट म्हणजे फटाके. आणि न आवडणारी गोष्ट म्हणजे सुटीमध्ये शाळेतून देण्यात आलेला गृहपाठ.
सुटीचा एकेक दिवस संपतो, त्याप्रमाणे गृहपाठाच्या धसक्याने मुलांची धाकधूक अधिकच वाढत जाते. त्यामुळे त्यांना धड सुटीचा आनंदही घेता येत नाही. अशावेळी त्यांना घरातील मोठय़ांचा हेवा वाटतो.
मोठय़ांनाही हवा होता गृहपाठ, असे त्यांना वाटत असते.
त्यांची ही सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठीच खास नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मोठय़ांसाठी दिवाळीच्या सुटीनिमित्त गृहपाठ म्हणून राजकीय प्रश्नपत्रिका घेऊन आलो आहोत.
अर्थात प्रश्नपत्रिका सोडविताना मोठय़ांना डोकं अधिक खाजवावे लागू नये म्हणून तिचे स्वरूप सोपे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रश्नासाठी १० गुण, याप्रमाणे एकूण ५० गुण. प्रश्नपत्रिका सोडवून स्वत:जवळच ठेवावी. सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर आल्यास तो एक योगायोग समजावा.    
प्रश्न- १) एका वाक्यात उत्तरे द्या.
१) ‘नाशिक फेस्टिव्हल’चे जनक कोण ?
२) इशू संधू या अधिकाऱ्याने जळगावच्या इतिहासात कोणता पराक्रम गाजविला ?
३) नंदुरबार जिल्ह्यातील पालिका निवडणुकांमध्ये पानिपत झालेला पक्ष कोणता ?
४) गिरणा साखर कारखान्याचे पूर्वीचे आणि सध्याचे मालक कोण ?
५) प्रशांत हिरे, अव्दय हिरे व अपूर्व हिरे हे कोणकोणत्या पक्षाशी संबंधित आहेत ?
..
प्रश्न-२) पुढील प्रश्नांचे योग्य पर्याय निवडा.
१) मालेगाव जिल्हा होणारच, हे उद्गार पुढीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्याचे नाहीत.
अ) अ. र. अंतुले  ब) मनोहर जोशी  क) विलासराव देशमुख  ड) पृथ्वीराज चव्हाण
२) सुरेश जैन यांचे नाव किती घोटाळ्यांमध्ये घेतले जात आहे ?
अ) १ ब) ५० क) ५ ड) ७
३) ‘मेरे दो अनमोल रतन’ हे वाक्य छगन भुजबळ यांच्यासंदर्भात पुढीलपैकी कोणत्या जोडीला चपखल लागू होईल ?
अ) दिलीप खैरे-आनंद सोनवणे  ब) जयंत जाधव-शरद कोशिरे  क) समीर भुजबळ-पंकज भुजबळ  ड) संजय चव्हाण-सचिन महाजन
४) पुढीलपैकी कोणती बँक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे चर्चेत आहे ?
अ) जळगाव जिल्हा बँक  ब) धुळे-नंदुरबार जिल्हा बँक  क) नाशिक जिल्हा बँक  
ड) या सर्वच बँका
५) हिरे घराण्याने आतापर्यंत केलेल्या मोठय़ा विकास कामांची संख्या किती ?
अ) ५  ब) १  क) १० ड) यापैकी एकही नाही
..
प्रश्न- ३) ‘अ’ भागात काही जणांची नावे देण्यात आली असून ‘ब’ भागात ज्या गैरव्यवहारासंदर्भात आरोप केले जात आहेत, ते देण्यात आले आहेत.
यापैकी योग्य जोडय़ा जुळवा.
अ) सुरेश जैन             इ) आदिवासी विकास
ब) छगन भुजबळ           अ) घरकुल
क) रोहिदास पाटील         ड) जवाहर सूत गिरणी
ड)  ईश्वरलाल जैन         ब) महाराष्ट्र सदन
इ) डॉ. विजयकुमार गावित  क) जिल्हा बँक अध्यक्षपद निवडणूक

प्रश्न- ४) चूक की बरोबर ते सांगा.
१) नाशिक शहर शिवसेनेत व काँग्रेसमध्ये सर्व गुण्यागोविंदाने राहात आहेत.
२) अमरीश पटेल आणि रोहिदास पाटील यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध आहेत.
३) सुरेश जैन यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आहे.
४) अनिल गोटे हे कधीच पत्रकबाजी करीत नाहीत.
५) माणिकराव कोकाटे हे अतिशय मवाळ आहेत.

प्रश्न- ५) खालील उद्गार कोणाचे, उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा.
१) ओबीसी म्हणून टार्गेट केले जात आहे.
अ) गजानन शेलार  ब) वसंत गिते  क) छगन भुजबळ  ड) तुकाराम दिघोळे
२) मरते दम तक माणिकराव गावित हे खासदार राहतील.
अ) डॉ. विजयकुमार गावित  ब) भरत गावित  क) चंद्रकांत रघुवंशी ड) स्वरूपसिंग नाईक
३) साहेब, तुमचे किती हट्ट पुरवायचे ?
अ) दादा भुसे  ब) अनिल कदम  क) बबन घोलप  ड) माणिकराव कोकाटे
४) नाशिकच्या विकासाची ब्लू प्रिंट माझ्याकडे तयार आहे.
अ) पृथ्वीराज चव्हाण  ब) छगन भुजबळ  क) राज ठाकरे  ड) बबन घोलप
५) अशा लुंग्यासुंग्यांना मी नाही विचारत. शरद पवार माझे नेते आहेत.
अ) सुरेश जैन  ब) गुलाब देवकर  क) ईश्वरलाल जैन  ड) संतोष चौधरी