साहित्यात दिवाळी अंकांचा प्रवाह कायम असून दिवाळीनिमित्ताने अंक काढण्याची समृद्ध परंपरा आजही जोपासली जात आहे. दिवाळीत फराळ, मिठाई, फटाके यासोबतच दिवाळी अंकांची वाचकांकडून मोठय़ा प्रमाणात खरेदी होत आहे. ज्ञानाचा प्रकाश देणारे दिवाळी अंक संस्कृतीचा एक भाग बनले आहेत. यावर्षी शहरात वेगवगळ्या ठिकाणी पुस्तक विक्रेत्यांकडे विविध प्रकाशकांचे अडीचशे ते तीनशे दिवाळी अंक विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. पूर्वी साहित्याशी संबंधित अंकांना मागणी असायची, पण आता दिवाळी अंकांचे स्वरूप बदलले असून ज्योतिष्य, आरोग्य, पाककृती, व्यापार, पर्यावरण, राजकीय, व्यवस्थापन, वास्तूशास्त्र, भ्रमंती, भटकंती, संत साहित्य, व्यक्तिमत्व विकास आदी विविध विषयांवरील अंकांनाही चांगली मागणी आहे.
आवाज, माहेर, मेनका, छंद, धनंजय, चंद्रिका, ज्योतिष्यमध्ये ग्रहसंकेत, भाग्यसंकेत, ग्रहांकित या अंकांनाही वाचकांकडून चांगली मागणी आहे. वास्तू संस्कृती, दुर्गेच्या देशात, साहित्य विहार हे नवे दिवाळी अंक यावर्षी आले आहेत. बालगोपाल छोटू, गंमत जमत, किशोर आदी अंकांची खरेदी वाचक आवडीने करीत आहेत.
यावर्षी वाढत्या महागाईची मोठी झळ दिवाळी अंकांना बसली नसली तरी दिवाळी अंकांच्या किमतीत दहा ते पंधरा टक्के वाढ झालेली आहे. दिवाळी अंकांच्या किमती ६० पासून १५० रुपयांपर्यंत आहेत. मोरभवनातील ग्रंथ प्रदर्शनातही मोठय़ा प्रमाणात दिवाळी अंक उपलब्ध असून खरेदीवर अंकांच्या किमतीत वाचकांना दहा टक्के सूट दिली जात आहे. विविध प्रकाशकांनी दिवाळीच्या निमित्ताने वाचकांसाठी हा बौद्धिक फराळ उपलब्ध करून दिला आहे.
दिवाळी अंक हे साहित्य व्यवहाराचेच एक रूप आहे. वैयक्तिक पातळीवर, तसेच सार्वजनिक व खासगी ग्रंथालयांकडून दिवाळी अंकांची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जात आहे. सर्व प्रकारचे वाङ्मयीन साहित्य वाचकांना मिळत आहे. बदलत्या तंत्रानुसार इंटरनेटच्या माध्यमातूनही अंक वाचकांना उपलब्ध करून देण्याचे काही प्रकाशकांचे प्रयत्न आहेत. साहित्य चळवळ पुढे नेण्यास दिवाळी अंक मोठा वाटा उचलत आहेत. दृष्टीहीनांसाठी ब्रेल लिपीतील अंक शहरात अजून उपलब्ध झालेले नाहीत.
यंदाही दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा कायम
साहित्यात दिवाळी अंकांचा प्रवाह कायम असून दिवाळीनिमित्ताने अंक काढण्याची समृद्ध परंपरा आजही जोपासली जात आहे. दिवाळीत फराळ, मिठाई, फटाके यासोबतच दिवाळी अंकांची वाचकांकडून मोठय़ा प्रमाणात खरेदी होत आहे. ज्ञानाचा प्रकाश देणारे दिवाळी अंक संस्कृतीचा एक भाग बनले आहेत. यावर्षी शहरात …
First published on: 09-11-2012 at 02:34 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali issue tradition continue