कुठे पाच ते दहा हजाराच्या माळांनी उडविलेली धूम तर कुठे म्युझिकल क्रॅकर, ब्रेक व पिकॉक डान्स सारख्या फॅन्सी प्रकारांनी अधोरेखीत केलेले वेगळेपण.. एवढेच नव्हे तर, सिग्नल लाईट, कलर फ्लॅश, माईन ऑफ क्रॅकर, ट्रिपल फन, सिंगिंग बर्ड अशा फटाक्यांची आतषबाजी.. मंगळवारी सायंकाळी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आसमंत असे विविधरंगी फटाक्यांनी उजळून निघाले अन् प्रकाशोत्सवातील लखलखीतपणा अनुभवयास मिळाला.
यावर्षी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्यामुळे पहाटेपासूनच सर्वाची लगबग सुरू झाल्याचे दिसून आले. बाजारपेठेतील गर्दी दुपारनंतर हळूहळू कमी होऊ लागली. व्यापारी व व्यावसायिकांसाठी लक्ष्मी पूजनाचे सर्वाधिक महत्व. त्याची जय्यत तयारी या वर्गाने आधीच करून ठेवलेली होती. सकाळपासून फुलांनी सजविलेली दुकाने सायंकाळी दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाली. वर्षभराचा जमा-खर्च मांडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खतावण्या, चोपडय़ा यांच्याबरोबर धनाचे विधीवत पूजन करण्यात आले. कारखाने, बँका, व्यापारी केंद्र, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी यंत्रसामग्रीचे विधीवत पूजन करण्यात आले. लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त साधण्याकडे प्रत्येकाचा कल होता. घरोघरी केरसुणीची लक्ष्मीच्या स्वरूपात पूजा करण्यात आली. पूजन झाल्यानंतर बाल गोपाळांसह घरातील सर्वच जण फटाके उडविण्यात मग्न झाले.
प्रमुख बाजारपेठांमध्ये पाच ते दहा हजारांच्या माळांवर अधिक भर असल्याने आवाजाने परिसर दुमदुमून गेला होता. निवासी भागात आवाजापेक्षा फॅन्सी प्रकारांना पसंती मिळाल्याचे पहावयास मिळाले. सिग्नल लाईट, कलर फ्लॅश, ब्रेक व पिकॉक डान्स, व्हीसल व्हीज अशा विविध फॅन्सी प्रकारांची आकाशात जणू परस्परांशी स्पर्धा सुरू असल्याचे पहावयास मिळाले.
दिवाळीच्या कालावधीत आवाजाच्या तीव्रतेचे मोजमाप करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरात ठिकठिकाणी ध्वनी पातळी मोजण्याची मोहीम हाती घेतली आहे. दिवाळीच्या दिवशी सकाळी सहा ते रात्री बारा या कालावधीत फटाके वाजविण्यास परवानगी आहे. फटाक्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या काही विशिष्ट रासायनिक घटकांवर बंदी घालण्यात आली आहे. अशा घटकांचा अंतर्भाव असणाऱ्या फटाक्यांचा वापर किंवा विक्री झाल्यास ही बाब नियमांचे उल्लंघन या सदरात मोडू शकते, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्पष्ट केले आहे. ध्वनिची पातळी मोजण्याची प्रक्रिया धनत्रयोदशीच्या दिवसापासून सुरू झाली असून पुढील काही दिवस सलगपणे सुरू राहणार असल्याचे मंडळाच्या क्षेत्रीय अधिकारी सौजन्या पाटील यांनी सांगितले.
ध्वनिची पातळी सर्वसाधारणपणे ५५ ते ६० डेसिबलपर्यंत असते. शहरातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या कारणामुळे या पातळीत चढ-उतार झाल्याचे लक्षात येते. अधिकाधिक ८० डेसिबलपर्यंतचा आवाज सहन केला जाऊ शकतो. त्यापुढील तीव्रतेचा आवाज मात्र सहन करण्यापलिकडे जातो. दिवाळीत फटाक्यांमुळे ही पातळी १०० डेसिबलच्या पुढे जाऊ शकते. फटाक्यांच्या प्रकारानुसार ११० ते ११५ डेसिबलपर्यंतच्या आवाजास शासनाने संमती दिली आहे. या संदर्भातील नियमांचे उल्लंघन करताना कुणी आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने दिला आहे. शहरातील सीबीएस, पंचवटी, दहीपूल, बिटको चौक आणि सिडको या भागात हे मापन केले जात असल्याचे पाटील यानी सांगितले.
आतषबाजीत लक्ष्मीचे पूजन
कुठे पाच ते दहा हजाराच्या माळांनी उडविलेली धूम तर कुठे म्युझिकल क्रॅकर, ब्रेक व पिकॉक डान्स सारख्या फॅन्सी प्रकारांनी अधोरेखीत केलेले वेगळेपण.. एवढेच नव्हे तर, सिग्नल लाईट, कलर फ्लॅश, माईन ऑफ क्रॅकर, ट्रिपल फन, सिंगिंग बर्ड अशा फटाक्यांची आतषबाजी..
First published on: 13-11-2012 at 11:32 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali laxi pujan with firecrackers