वसुबारस, धनत्रयोदशीनंतर लक्ष्मीपूजन. गेला महिनाभरापासून विविध दुकानांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली. दुकानदार, व्यापाऱ्यांना निवांतपणा नव्हताच. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र सगळे व्यवहार बंद ठेवून मोठय़ा भक्तिभावाने पूजाअर्चा करण्यात आली. धार्मिक पूजापाठ झाल्यानंतर सुरू झालेली फटाक्यांची मनमुराद आतषबाजी रात्री उशिरापर्यंत चालली. घरोघरी आकाशकंदिलांचा लखलखाट, दारापुढे पणत्यांचा मिणमिणता उजेड, फराळ-मिठाईचा आस्वाद नि शोभेचे दारूकाम असा उत्साहवर्धक नजारा पाहावयास मिळाला.
व्यापाऱ्यांच्या दृष्टीने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. हिंदू कालगणनेनुसार विक्रम संवत २०६९ हे नववर्ष सुरू होणार आहे. लक्ष्मीपूजन हे प्रदोषकाळी केले जाते. लक्ष्मीपूजनासाठी हाच शुभमुहूर्त. या दिवशी दुकान स्वच्छ करून, सजवून व्यापारी आपल्या कुटुंबांसह लक्ष्मीपूजन करतात. या दिवशी वहीपूजन करण्याची पद्धत आहे. त्याचीच लगबग मंगळवारी शहरात दिसून येत होती. परंपरेप्रमाणे सर्व कुटुंबीयांनी एकत्रित येऊन लक्ष्मीपूजन केले जाते. शहरातील मोंढा, गुलमंडी, सिडको भागात असलेल्या दुकानांमध्ये लक्ष्मीपूजनाची जय्यत तयारी दिसून येत होती. लक्ष्मीपूजनानंतर फटाके फोडण्यातही व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये उत्साह दिसून येत होता.
व्यापाऱ्यांप्रमाणेच घराघरांमध्येही लक्ष्मीपूजनाची तयारी सकाळपासूनच सुरू होती. घरातील महिलावर्ग पूजेसाठी लागणारी भांडी घासूनपुसून स्वच्छ करण्यात मग्न होत्या. या दिवशी लागणाऱ्या बत्ताशे, लाहय़ा, साखरफुटाण्यांचा प्रसाद, पाच फळे तसेच गणेश, लक्ष्मी व सरस्वती या देवतांच्या एकत्रित फ्रेम असलेल्या प्रतिमा खरेदी करण्यासाठी बाजारात एकच गर्दी झाली होती. गर्दीतून वाट काढायलाही जागा नव्हती. चौरंगाची खरेदीही उत्साहात होत होती. लक्ष्मीमातेला कमळ हे फूल प्रिय म्हणून अनेकजण कमळाचे फूल खरेदी करताना दिसत होते. एका फुलाची किंमत २० रुपये असूनसुद्धा लोक ते घेत होते. फुलांच्या बाजारातही खरेदीची धूम होती. पारंपरिक उत्साह नि जल्लोषात सगळीकडे लक्ष्मीपूजन साजरे झाले.
मुहूर्ताचे लक्ष्मीपूजन, फटाक्यांची आतषबाजी!
वसुबारस, धनत्रयोदशीनंतर लक्ष्मीपूजन. गेला महिनाभरापासून विविध दुकानांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली. दुकानदार, व्यापाऱ्यांना निवांतपणा नव्हताच. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र सगळे व्यवहार बंद ठेवून मोठय़ा भक्तिभावाने पूजाअर्चा करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-11-2012 at 01:05 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali laxmi pujan and firecrakers