महाराष्ट्राचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ल्यांचा ‘राजा’अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ल्यावर यंदाही दिवाळी पहाट साजरी झाली. ‘महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती परिवार’ या संस्थेतर्फे २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नवीन पिढीला महाराष्ट्राच्या या गड-किल्ल्यांची माहिती व्हावी, दुर्लक्षित असलेल्या या वास्तू दिवाळीच्या दिवसात प्रकाशाने उजळून निघाव्यात या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष होते. रायगडावर येताना प्रत्येकाने एक पणती किंवा मशाल घेऊन यावे, असे आवाहन दुर्गसंपत्ती परिवाराने केले होते. या आवाहनास राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि मुंबईसह पंढरपूर, अकोला, नाशिक, पुणे आदी विविध ठिकाणाहून शिवप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. या मंडळींनी आणलेल्या हजारो पणत्या आणि काही मशालींनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी, जगदीश्वर मंदिर, शिर्का देवी मंदिर, होळीचा माळ, राजदरबारासह संपूर्ण रायगड प्रकाशात उजळून निघाला. यंदा दिव्यांच्या रोषणाईचे खास वैशिष्टय़ म्हणजे वसई येथील वसई संवर्धन मोहिमेतील श्रीदत्त राऊत यांनी १७ व्या शतकातील दगडी पणती या कार्यक्रमासाठी पाठवली होती. या वर्षीच्या कार्यक्रमास सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे व दुर्ग संवर्धक महासंघाचे अध्यक्ष मिलिंद उपस्थित होते. दुर्गसंपत्ती परिवाराचे निखिल साळसकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सुरू झाला असून दुर्गसंपत्ती परिवाराचे अनेक कार्यकर्ते यांचा कार्यक्रम आयोजनात महत्त्वाचा सहभाग होता. संस्थेतर्फे पुढील वर्षीही १० आणि ११ नोव्हेंबर रोजी ‘एक पहाट रायगडावर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा