लक्ष लक्ष दिव्यांचा भारताचा पारंपरिक सण दिवाळी यंदा मात्र पिढीजात कारागिरी करणाऱ्यांसाठी संक्रांत घेऊन आला आहे. या सणासाठी पारंपरिक कारागिरांनी तयार केलेल्या कंदील, पणत्यांपासून सजावटीच्या वस्तू तसेच छोटय़ामोठय़ा भेटवस्तूंना बाजारपेठच दुरापास्त झाली आहे. आधीच किफायती चिनी मालामुळे तुडुंब भरलेल्या बाजारपेठांमुळे भारतीय वस्तूंना तेथे जागा मिळणेही मुश्कील झाले आहे, असे ‘अ‍ॅसोचॅम’ या उद्योगजगताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिखर संघटनेचे निरीक्षण आहे.भारतीय कारागिरांना चिनी बनावटीच्या दिसायला आकर्षक आणि स्वस्त उत्पादनांपुढे टिकाव धरणे कठीण बनले आहे. वर्षांतील सर्वाधिक कमाईच्या काळातच खिशाला अशी कात्री लागताना पाहणेच त्यांच्या नशिबी आले आहे, असा दावा अ‍ॅसोचॅमचे महासचिव डी. एस. रावत यांनी पाहणीचे निष्कर्ष सांगताना केला.
चिनी बनावटीच्या विजेच्या दिव्यांची तोरणे, कंदीले, फटाके इतकेच काय भारतीय देवी-देवतांच्या मूर्त्यां आणि तसबीरींनी बाजारपेठा फुलल्या असून, त्यांचा बाजारहिस्साही उत्तरोत्तर वधारत असल्याचे अ‍ॅसोचॅमच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत या ऐवजांचा बाजारहिस्सा ४५ टक्क्यांनी वधारला असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि पुणे या महानगरांमधील ३०० ग्राहक आणि ५० घाऊक विक्रेत्यांशी संवाद साधत ही पाहणी पूर्ण केली गेली आहे.
भारतात असंघटित रूपात असलेल्या फटाके उद्योगात जवळपास अडीच लाख लोकांना थेट रोजगार पुरविला जात असून, या उद्योगावर गुजराण चालणाऱ्यांची संख्या आणखी पाच लाखांच्या घरातील असेल, असे रावत यांनी सांगितले. शिवाय दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या हंगामी स्वरूपाच्या व्यवसाय आपल्या कारागिरीच्या कसबावर चालविणाऱ्यांची संख्याही पाच ते सहा लाखांच्या घरातील आहे. आधीच देशात गेली दोन वर्षे मंदीचे फटकारे झेलणाऱ्या या कारागिरांना यंदाच्या सणोत्सवातही पदरी फारसे काही पडण्याची उमेद नसल्याचेच ही पाहणी सांगते.  
छोटेखानी १०० बल्ब्सचे चिनी बनावटीच्या दिव्यांचे तोरण हे ४० ते ६० रुपयात मिळते, त्या उलट भारतात बनविले गेलेल्या सारख्याच तोरणाची किंमत १५० रुपयांच्या घरात आहे. चिनी कंदीलांचे किमतीचे पारडेही असेच जवळपास पाच पटींनी हलके असल्याचे आढळून येते. यामुळे सर्वेक्षणातील ७८ टक्के ग्राहकांनी तुलनेने खूपच स्वस्त असलेल्या चिनी बनावटीच्या तोरण-कंदीलांना पसंती दिली असल्याचे ही पाहणी सांगते. स्वस्त असण्याबरोबरच विजेच्या खर्चात बचतीसाठी ती उपयुक्त असल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात आले. केवळ वर्षांतून काही दिवसच वापरात येत असल्याने उत्पादनांचा टिकाऊपणा हा गुण फारसा महत्त्वाचा नसल्याचे ग्राहक सांगतात. नेपाळमार्गे भारतीय बाजारपेठेत बेकायदा शिरकाव करणाऱ्या चिनी बनावटीच्या फटाक्यांना अनेक घाऊक विक्रेत्यांकडूनही पसंती मिळत असल्याची त्यांनी या सर्वेक्षणात कबुली दिली. भारतीय फटाक्यांच्या बाजारपेठेतील १८०० कोटी रुपयांचा हिस्सा या चिनी फटाक्यांनी बळकावला असल्याचा ढोबळ अंदाज रावत यांनी व्यक्त केला. चिनी फटाके हे किमतीत किफायती असण्याबरोबरच, ते अधिक वेगवेगळ्या स्वरूपात, विविध रंगी उधळण करणारे असल्याने त्यांना ग्राहक पसंती देतात, असे घाऊक विक्रेत्यांचे म्हणणे आहे. भारतात असंघटित रूपात असलेल्या फटाके उद्योगात जवळपास अडीच लाख लोकांना थेट रोजगार पुरविला जात असून, या उद्योगावर गुजराण चालणाऱ्यांची संख्या आणखी पाच लाखांच्या घरातील असेल, असे रावत यांनी सांगितले. शिवाय दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या हंगामी स्वरूपाच्या व्यवसाय आपल्या कारागिरीच्या कसबावर चालविणाऱ्यांची संख्याही पाच ते सहा लाखांच्या घरातील आहे. आधीच देशात गेली दोन वर्षे मंदीचे फटकारे झेलणाऱ्या या कारागिरांना यंदाच्या दिवाळीत पदरी फारसे काही पडण्याची उमेद नसल्याचेच ही पाहणी सांगते.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा