सणासुदीच्या निमित्ताने विविध वस्तूंची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. तो लक्षात घेऊन नियमांची पायमल्ली करीत वस्तूंचे विपणन (मार्केटिंग) केले जात असल्याचे दिसते. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा नको, म्हणून मनपा कर्मचारी, वाहतूक पोलीस व सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी त्यांच्या मनात येईल तेव्हा जागे होतात. संबंधित मंडळींनी त्यांच्या वरखर्चाची व्यवस्था केली, की ते निघून जातात व प्रश्न मात्र जशास तसे शिल्लक राहतात!
वरिष्ठांना अहवाल पाठविण्यासाठी किरकोळ दंडही वसूल केला जातो व सर्वकाही आलबेल दाखवले जाते. औसा रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून फेरीवाले ठाण मांडून असतात. सणासुदीच्या वेळेला आकाशकंदील, मातीचे दिवे, मूर्ती विकणारे अशा अनेकांचा यात समावेश असतो. आपला व्यवसाय एका ठिकाणी बसून करण्यास लागणारे भांडवल नसणारी मंडळी रस्त्यावर बसून व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात. नियमानुसार हे चुकीचे असले तरी एक वेळ क्षम्य आहे. चारचाकी वाहनांची विक्री करण्यासाठीच्या शोरूम आता प्रत्येक शहरात आहेत. तशा त्या लातूरमध्येही आहेत. शोरूम गावापेक्षा लांब असल्यामुळे ग्राहकांच्या दारात पोहोचण्यासाठी म्हणून रस्त्यावर विनापरवाना मंडप टाकून चारचाकी वाहनांची विक्री करण्याचे स्टॉल लागले आहेत. त्यात टाटा मोटर्स, मारुती सुझुकी अशा बडय़ा कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या चार दिवसांपासून हे स्टॉल बिनबोभाट दिवसभर सुरू असतात. महापालिका, पोलीस, सार्वजनिक बांधकाम खाते यापैकी कोणाचेही याकडे लक्ष जात नाही.
सणासुदीचे निमित्त करून शहराच्या विविध भागांत व्यवसाय करणारे प्रत्येकजण आपल्या दुकानाच्या बाहेरच्या जागेवर अतिक्रमण करून वस्तूंचे प्रदर्शन करतात. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. जागा अपुरी पडते. तसेच अपघातांचे प्रमाण वाढते, याबद्दल कोणालाही चिंता नसते. प्रत्येकजण आपल्या एकटय़ाचीच ही जबाबदारी कशी नाही, अन्य मंडळी कसे दुर्लक्ष करतात, हे सांगण्यात वेळ घालवतात. बांधकाम विभागाच्या खात्यातील मंडळीही आम्ही नव्याने बदलून आलो आहोत, अशी कारणे सांगत जुनीच प्रथा चालू ठेवत आहेत.
दिवाळीची खरेदी अन् नियमांची पायमल्ली!
सणासुदीच्या निमित्ताने विविध वस्तूंची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. तो लक्षात घेऊन नियमांची पायमल्ली करीत वस्तूंचे विपणन (मार्केटिंग) केले जात असल्याचे दिसते. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा नको, म्हणून मनपा कर्मचारी, वाहतूक पोलीस व सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी त्यांच्या मनात येईल तेव्हा जागे होतात.
First published on: 07-11-2012 at 01:08 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali purchase and rules not get followed