चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे उत्साहवर्धक वातावरण दिवाळीच्या पर्वातही कायम राहील, असा अंदाज यंदाही महागाईने फोल ठरविला. फटाके, कपडे खरेदी, पूजा साहित्य, सोने खरेदी, भेटवस्तू, फराळाच्या पदार्थाची खरेदी या सर्वच बाबतींत काटकसर करण्याकडेच बहुतांशी लोकांचा कल दिसून आला.
सोने खरेदीत दिवाळीच्या दिवसांत प्रचंड गर्दी असते. या पूर्वी दिवाळीच्या दिवसांत सोन्याचे भाव वाढतच होते. मात्र, सोने खरेदीत फारशी घट नव्हती. या वर्षी लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येलाही सराफी दुकानांत शुकशुकाट होता. व्यापाऱ्यांना मोठय़ा उलाढालीची अपेक्षा होती. मात्र, लोकांनी सोने खरेदी न करणेच पसंत केले. त्याऐवजी चांदीच्या खरेदीवर लोकांचा भर अधिक होता. १५ दिवसांपूर्वीच राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणात फटाक्यांची दुकाने थाटली होती. तेरखेडा, शिवकाशी आदी ठिकाणांहून भरगच्च माल विक्रीस ठेवला होता. मात्र, मागील तुलनेत विक्रीमध्ये ३० टक्क्य़ांपेक्षा अधिक घट झाल्याचे फटाके विक्रेत्यांचे म्हणणे होते. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे अभियान राबवल्याचा हा परिणाम असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी केला. वाढत्या महागाईमुळे फटाके खरेदीला फाटा देण्यात आला.
पूर्वी दिवाळीला नवीन कपडे खरेदी करण्याकडे कल होता. आता सणानिमित्त कपडे घेण्याऐवजी कधीही हवी तशी खरेदी केली जात असल्यामुळे केवळ दिवाळीच्या वेळीच कपडय़ांच्या खरेदीची गर्दी बाजारात फारशी आढळली नाही. त्यामुळे कपडे बाजारात ४० टक्क्य़ांपेक्षा कमी उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. तयार कपडय़ांकडे लोकांचा अधिक कल आहे. मात्र, त्याही दुकानांत फारशी विक्री झाली नाही.
दिवाळीनिमित्त काजू, बदाम, मनुके (ड्राय फ्रुट्स) यांची भेटवस्तू देण्यासाठी म्हणून आवर्जून खरेदी होत असली, तरी काजू, बदाम यांच्या किमती गगनाला भिडल्यामुळे याची खरेदी तुलनेने कमीच झाली. दिवाळीच्या फराळाचे पदार्थ बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होते. डाळी, तेलाच्या किमतीत वाढ झाली असल्यामुळे घरगुती गरजेपुरतेच पदार्थ खरेदी केले जात होते. भेटवस्तूसाठी अतिरिक्त खरेदी या वर्षी फारशी झाली नसल्याचे आढळून आले.
लक्ष्मीपूजनानिमित्त संगणकावर हिशेब ठेवण्याची पद्धत असली, तरी पूजेसाठी खातेवही खरेदीची पद्धत याही वर्षी टिकून असल्याचे दिसून आले. स्टेशनरी दुकानातील खरेदी दरवर्षीसारखीच असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे होते. पूजेसाठी पेढय़ाचा मान महत्त्वाचा असतो. त्यातही शहरातील किसन हलवाई यांच्या दुकानातील पेढे खरेदी करण्याकडे लोकांचा अधिक कल असतो. वाहतूक पोलिसांना या दुकानासमोर लोकांना रांगा लावण्यासाठी म्हणून ४ पोलीस तनात करावे लागले. अधिकाधिक लोकांना पेढे घेता यावेत, या साठी एका ग्राहकाला एका वेळी २ किलोपेक्षा अधिक पेढे दिले जात नव्हते, असेही दिसून आले.
दिवाळीनिमित्त शुभेच्छापत्र पाठविणे आता जवळपास कालबाहय़ झाले आहे. त्याची जागा मोबाइल एसएमएस व त्यातही व्हॉटसपवरून संदेशाने घेतली आहे. त्यास वेगळे पसे मोजावे लागत नसल्यामुळे मोबाइलधारकांसाठी ती पर्वणीच ठरली. दिवाळी व महागाई हातात हात घालून येतात, त्यामुळे ज्यांचे कमी उत्पन्न, त्यांना स्वाभाविकपणे दिवाळीच्या खर्चात काटछाट करावी लागते. अधिक उत्पन्न असणाऱ्यांना मात्र ‘राजाला रोजचीच दिवाळी’ या सूत्राने महागाईची कधी झळ बसत नाही. दिवाळीवर महागाईचे संकट असल्याचा दावा केला जात असतानाच, काही ठरावीक दुकानांमधील विक्री मात्र वाढली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. प्लॉट खरेदी, प्लॅट खरेदीवर गेले वर्षभर मोठे सावट होते. दिवाळीच्या मुहूर्ताने हे सावट दूर झाले असल्याचा दावा प्लॉट विक्रेते व बिल्डर्सनी केला. या बाजारपेठेतील उलाढाल सुरू झाल्यामुळे या लोकांच्या चेहऱ्यावर दिवाळी निमित्ताने हसूच दिसून आले.

Story img Loader