अन्य वस्तूंप्रमाणेच दिवाळीतील ‘साहित्य फराळ’ अर्थात दिवाळी अंकही महागले आहेत. यंदा दिवाळी अंकांच्या किमतीत दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे. काही दिवाळी अंकांच्या किंमती २५० रुपयांच्या घरात गेल्या आहेत. तर बहुतांश दिवाळी अंकांच्या किंमती १५० ते २०० रुपयांदरम्यान आहेत.
‘दिवाळी अंक’ ही मराठी भाषा आणि संस्कृतीची गेल्या शंभरहून अधिक वर्षांची मोठी परंपरा आहे. काही वर्षांपूर्वी कथा, कविता, लेख, कादंबरी अशा स्वरुपात ‘साहित्य’ विषयक दिवाळी अंक जास्त प्रमाणात दिसून येत असत. मात्र अलिकडच्या काही वर्षांत या स्वरुपात बदल झाला असून ज्योतिष, पाककला, पर्यटन, उद्योग-व्यवसाय, वास्तुशास्त्र, महिला अशा विविध विषयांवरील सुमारे ३५० ते ४०० दिवाळी अंक बाजारात पाहायला मिळतात. अन्य कोणत्याही भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये दिवाळी अंक ही संकल्पना नाही.
सर्वच क्षेत्रात महागाई झाली असून प्रामुख्याने वाहतूक, कागद यात झालेल्या दरवाढीमुळे दिवाळी अंकांच्या किंमतीतही काही प्रमामात वाढ करावी लागली आहे. सर्वसाधारणपणे दिवाळी अंक हे वेब ऑफसेट किंवा शीटफेड प्रिटिंग या प्रकारात केले जातात. कागद, शाई, पेट्रोल-डिझेल, छपाई यातील दरवाढीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळी अंकांच्या किमतीत १५ ते २० टक्के  वाढ झाली असल्याचे दिवाळी अंकांच्या संपादकांची संघटना असलेल्या ‘दिवा प्रतिष्ठान’चे प्रमुख कार्यवाह शिवाजी धुरी यांनी सांगितले.
तर ८० टक्के दिवाळी अंक १२० ते १८० रुपये आणि २० टक्के अंक २०० ते २५० रुपये या किंमतीचे असल्याचे  ‘दीपावली’ आणि ‘ललित’ या अंकांचे संपादक अशोक कोठावळे म्हणाले. ‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’ या दिवाळी अंकात एकही जाहिरात नाही. जाहिरातींशिवाय असलेल्या या प्रत्येक अंकांची किंमत २५० रुपये आहे. या तीन दिवाळी अंकांची गेल्या वर्षीही तेवढीच किंमत होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत अन्य अंकांच्या यंदा किंमतीत १० ते १५ रुपयांची  तसेच काहींनी वाढ झाल्याचे ‘बी.डी. बागवे वितरक कंपनी’चे हेमंत बागवे यांनी सांगितले.    
दिवाळी अंकांची एकूण पाने, अंकातील जाहिरातींचे प्रमाण, छापण्यात आलेल्या प्रतींची एकूण संख्या, वितरकांना द्यावे लागणारे कमिशन आदी सर्व बाबींचा विचार करून दिवाळी अंकाची किंमत ठरविली जाते. त्यामुळे दिवाळी अंकांची निर्मिती करणाऱ्यांना एक अंक ज्या किंमतीला पडतो त्यापेक्षा ४० ते ६० रुपये जास्त अंकांची किंमत ठेवली जाते, असे या व्यवसायातील सूत्रांनी सांगितले.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवाळी अंकांची किंमत, गेल्यावर्षी आणि यंदा (रुपयांमध्ये)
अंकाचे नाव,         २०१३    २०१४
अंतर्नाद                     १५०      २००
धनंजय                 १५०      २००
आवाज                    १५०      १६०
शतायुषी                  १००      १२०

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali recipe ingredients become expensive