गेल्या काही वर्षांत दिवाळीचा फराळ तयार करून विकणे हा एक मोठा व्यवसाय बनला आहे. घरी फराळ तयार करण्याची प्रथा आता दिवसेंदिवस संपत चालली असल्याने तयार फराळाची बाजारपेठ त्या प्रमाणात वाढू लागली आहे. यंदा तयार फराळाला मागील वर्षीच्या दुप्पट मागणी येईल, असा अंदाज या क्षेत्रातील उद्योजक व्यक्त करीत आहेत. त्याचबरोबर महागाईमुळे फराळाच्या किमतीत सुमारे २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर परदेशी पाठवण्याच्या फराळांच्या दरात तर सुमारे ६० ते ७० टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
दादरच्या ‘ब्राह्मण सेवा मंडळा’चे पदाधिकारी दिनेश गानू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गेल्या वर्षी दिवाळीदरम्यान आमच्याकडे सुमारे पाच ते साडेपाच लाख किंमतीच्या फराळाची विक्री झाली होती. त्यामध्ये अर्थातच लाडू, चिवडा, चकली यांना जास्त मागणी होती.’ यंदाही त्यांनी याच दृष्टीने फराळ तयार करण्यास सुरवात केली आहे. दादरच्या ‘स्वागत फास्ट फूड’चे मयूर जावळे यांच्याकडे दिवाळीनिमित्ताने परदेशी फराळ पाठवण्याची सोय आहे. गेल्यावर्षी सुमारे १०० फराळाची पाकिटे त्यांनी परदेशी पाठवली होती. गेल्या वर्षी हा भाव १५०० रुपये होता. यंदा परदेशात फराळ पाठवण्याच्या पकिटांची किंमत २,५०० रुपयांपासून सुरू होत आहे. यंदा पाकिटांची संख्या १५० ते २०० पर्यंत जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. या पाकिटामध्ये पाच-पाच लाडू, अनारसे, करंज्या, पाव किलो चकली, पाव किलो शंकरपाळ्या, १०० ग्राम कडबोळ्या आदींचा समावेश असतो.
बेक फराळाला मोठी मागणी
गेल्या काही वर्षांपासून ‘बेक फराळा’ची मागणी जोर धरू लागली आहे. अर्थात अजूनही पारंपरिक फराळाच्या तुलनेत त्याचे प्रमाण कमीच आहे, असे जावळे यांनी सांगितले. ‘बेक फराळ बनवणे नेहमीचा फराळ बनवण्यापेक्षा जिकिरीचे असते. आहाराबाबत अधिक जागरुकता येत चालल्याने बेक फराळाला मागणी वाढू लागली आहे. या फराळात पदार्थ तेलातुपात तळण्याऐवजी भाजले जातात. त्यामुळे कॅलरी वाढत नाहीत. अन्य दुष्परिणामही कमी होतात. त्यामुळे हळूहळू बेक फराळ घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. अर्थात पारंपरिक फराळाची सवय झालेली मंडळी बेक फराळाबरोबरच पारपंरिक फराळही घेतात.
दिवाळी फराळ : ’ मागणीत दुपटीने वाढ ’ किमतीही २५ टक्क्यांनी महागल्या
गेल्या काही वर्षांत दिवाळीचा फराळ तयार करून विकणे हा एक मोठा व्यवसाय बनला आहे. घरी फराळ तयार करण्याची प्रथा आता दिवसेंदिवस संपत चालली असल्याने तयार फराळाची बाजारपेठ त्या प्रमाणात वाढू लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-10-2014 at 03:21 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali recipes demand increased by doubled