रंगीबेरंगी ब्लॉटिंग, बटर, जिलेटिन कागदांनी, चित्रांनी सजविलेल्या दिवाळी अभ्यासाच्या वहीचे शाळेत असताना एकेकाळी खूप अप्रूप असायचे. पण सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यांकन पद्धतीमुळे शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच आमूलाग्र बदलल्याने शाळाशाळांमधून दिवाळी अभ्यासाची ही परंपरा आता लुप्त होऊ लागली आहे. त्याऐवजी प्रयोगशीलतेवर भर देणाऱ्या लहानमोठय़ा प्रकल्पांमधून मुलांना अनुभवसमृद्ध करणारा ‘अभ्यास’ आजकाल शाळांमधून दिला जाऊ लागला आहे.
बालमोहन विद्या मंदिरसारख्या शाळांमध्ये दिवाळीच्या २५ दिवसांपैकी जवळपास १५ दिवसांचा गृहपाठ विद्यार्थ्यांना ठरवून दिला जायचा. हा अभ्यास एका वहीत करून ती वही सजवायची आणि वर्गशिक्षकांकडे जमा करायची. मग शिक्षक ती वही तपासून त्याला बक्षीस द्यायचे. ही परंपरा अगदी पाच-सहा वर्षांपूर्वीही कायम होती. आता दिवाळी अभ्यास आहे पण, त्याचे स्वरूप मात्र बदलले आहे.
‘मुलांना सुट्टीकाळात गृहपाठाचे दडपण नको म्हणून पंधराऐवजी चारच दिवसांचा अभ्यास आम्ही देतो. चार उदाहरणे, चित्रवर्णन, एकादसुसरा निबंध लिहून वही सजवायची. परंतु, या अभ्यासाचा भर प्रयोगशीलतेवर, मुलांची निरीक्षण शक्ती वाढविण्यावर अधिक असतो. पालकांसमवेत बाजारहाट करताना आलेले अनुभव, गावी गेल्यास दिवाळी कशी साजरी केली, या प्रकारचा अभ्यासक्रम आम्ही मुलांना देतो,’ असे बालमोहन शाळेच्या प्राथमिक शिक्षिका नयना वडके यांनी सांगितले.
पार्ले टिळक शाळेची दिवाळी अभ्यासाची परंपराही आता जवळपास खंडित झाल्यात जमा आहे. ‘पूर्वी आम्ही विद्यार्थ्यांना पाढे, कविता पाठांतर, वर्कशीट पूर्ण करा असा अभ्यास दिवाळीत देत असू. पण आता दहावीच्या विद्यार्थ्यांना सरावासाठी दिलेला बहुप्रश्नसंच वगळता शाळेच्या विद्यार्थ्यांना आम्ही गृहपाठ देत नाही,’ असे शाळेचे माध्यमिक शिक्षक अमित पालव यांनी सांगितले.
‘अभ्यासापेक्षा मुलांनी दिवाळीची सुट्टी आनंदाने घालवावी या उद्देशाने आम्ही गृहपाठ देत नाही. वह्यांचे ओझे कमी करण्यावर आमचा भर आहे. वर्कशीटही आम्ही वर्गात ठेवून घेतो. त्यामुळे दिवाळीला अभ्यास द्यायचा प्रश्नच येत नाही. त्याऐवजी मुलांनी पुस्तके वाचावी, प्रात्यक्षिककेंद्री उपक्रम करावे, यासाठी आम्ही त्यांना छोटे-मोठे प्रकल्प देत असतो,’ अशी माहिती हिंदू कॉलनीतील राजा शिवाजी विद्यालयाच्या प्राचार्य मीनाक्षी वडके यांनी अभ्यासाविषयीच्या बदललेल्या संकल्पनांविषयी सांगताना दिली.
दिवाळी अभ्यासाचे चाकोरीबद्ध स्वरूप कसे बदलले आहे हे सांगताना चेंबूरच्या स्वामी मुक्तानंद हायस्कूलचे अनिल बोरनारे म्हणाले की, ‘कुठलाही ताणतणाव न येता मुलांना दिलेला अभ्यास आनंदाने करावासा वाटला पाहिजे. त्यासाठी दिवाळी अंक, पुस्तके वाचणे, मुलाखती घेणे, गावात नदीवर गेलात तर दगड, पाने जमा करून त्याचे वर्गीकरण करा, अशा जबाबदाऱ्या दिल्या जातात. नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या सुट्टीत सराव करावा, असे सांगितले जाते.’ बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद हायस्कूलसारख्या शाळांनी यंदा मुलांना अजिबातच अभ्यास दिलेला नाही.
दिवाळी सुट्टीतील अभ्यास बदलला
रंगीबेरंगी ब्लॉटिंग, बटर, जिलेटिन कागदांनी, चित्रांनी सजविलेल्या दिवाळी अभ्यासाच्या वहीचे शाळेत असताना एकेकाळी खूप अप्रूप असायचे. पण सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यांकन पद्धतीमुळे शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच आमूलाग्र बदलल्याने शाळाशाळांमधून दिवाळी अभ्यासाची ही परंपरा आता लुप्त होऊ लागली आहे.
आणखी वाचा
First published on: 16-11-2012 at 12:26 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali vacation home work now change