दिवाळीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचारी संघटनेतर्फे लावण्यात आलेले शुभेच्छांचे पोस्टर मेडिकल प्रशासनाने काढून टाकल्यामुळे प्रशासन आणि कर्मचारी यांच्यामध्ये नवीन वाद निर्माण झाला आहे. या संदर्भात मेडिकल प्रशासनातील अधिकाऱ्यांविरोधात कर्मचारी संघटनेने आज अजनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मेडिकल प्रशासनाच्या विरोधात केव्हा काय घडेल याचा नेम राहिलेला नाही.
 कधी डॉक्टरांना मारहाण, कधी बाळ चोरी , कधी संप तर कधी औषधांचा तुटवडावरून मेडिकल सतत प्रकाशझोतात राहत असल्यामुळे त्याचा फटका रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना पडतो. मेडिकलमध्ये अनुसूचित जाती जमाती कर्मचारी महासंघ ही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संघटना आहे. ही संघटना दरवर्षी दिवाळीनिमित्त एक पोस्टर प्रकाशित करीत असते. मेडिकल परिसरातील विविध भागात पोस्टर लावले जात असताना मेडिकल प्रशासनाने दिवाळीपूर्वी काढून टाकले. यातून एक नवा वाद  निर्माण झाला.
पोस्टर काढताना कर्मचारी संघटनेला विश्वासात न घेता मेडिकल प्रशनानाने कारवाई केल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी प्रभारी अधिष्ठाता डॉ. आर.पी. सिंग यांना विचारणा केली मात्र ते काहीच उत्तर देऊ शकले     नाहीत.
प्रशासनातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी कुठलीही माहिती न देता तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली त्यामुळे कर्मचारी चांगलेच संतप्त झाले. दिवाळीनंतर संघटनेतर्फे सर्व पोस्टर काढली जाणार होती मात्र त्यापूर्वी प्रशासनाने ही कारवाई का केली असा प्रश्न कर्मचारी संघटनेने उपस्थित केला.
संघटनेचे सरचिटणीस आर.सी. अंभोरे, मेडिकल शाखेचे अध्यक्ष उमेश डोंगरे, रामू रगडे, कैलास ताकभोरे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा निषेध करून पोलीसाकडे तक्रार केली आहे.
दरम्यान उद्या, मेडिकल प्रशासन आणि कर्मचारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.