दहीहंडी उत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आळा बसावा यासाठी ठाणे पोलिसांनी जागोजागी तैनात केलेल्या विशेष पथकांना वाकुल्या दाखवत कर्णकर्कश अशा डीजे संगीताच्या घणघणाटात आणि गोविंदा पथकाच्या अलोट अशा उत्साहात गुरुवारी ठाणे नगरीत गोविंदाची धूम पाहावयास मिळाली. गेल्या वर्षी डीजेच्या घणघणाटात उत्सव साजरा करणाऱ्या दहीहंडी मंडळांविरोधात पोलिसांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे ‘उत्सव साजरे करा.पण आवाज वाढवू नका’, असे आवाहन पोलिसांनी केले होते. पोलिसांनी दिलेल्या ‘आवाजा’ला मंडळांनी यंदाही दाद दिली नाही. ठाण्यातील जवळपास सर्वच मोठय़ा मंडळांनी दहीहंडी फोडावयास आलेल्या गोिवदा पथकांवर पाण्याचे फवारे उडवत डीजेच्या तालावर थिरकायला लावले. विशेष म्हणजे, मुंबईतील प्रतिष्ठित गोविंदा पथकांना आव्हान उभे करत उपनगरातील नव्या पथकांनी आपले कौशल्य दाखवत मानवी मनोऱ्यांचा नवा नजराणा प्रेक्षकांपुढे सादर केला.
उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या र्निबधामुळे गेल्या वर्षी आवाजाची पातळी ओलांडणाऱ्या मंडळांविरोधात ठाणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. या वर्षीही मोठय़ा उत्सव मंडळातील आवाजाची पातळी मोजण्यासाठी पोलिसांनी खास पथके तयार केली. या पथकांनी वेगवेगळ्या मंडळांना भेटी देऊन तेथील आवाजाच्या पातळीची नोंद केली. अनेक ठिकाणी डीजेच्या घणघणाटामुळे आवाजाची पातळी ओलांडली जात असल्याचे चित्र होते. मात्र पातळी मोजण्यापलीकडे आवाज कमी व्हावा यासाठी पोलीस तात्काळ कारवाई करत असल्याचे चित्र अपवादानेच दिसत होते. ठाण्यातील लाखमोलाच्या बक्षिसांवर नजर ठेवत सकाळपासूनच मुंबईतील गोविंदांचे जथ्थे शहरात दाखल होत होते. लाखो रुपयांची बक्षिसे तसेच लहान थर रचणाऱ्या गोविंदा पथकांनाही बक्षिसे देण्यात येत असल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा ठाण्यात दाखल झालेल्या गोविंदा पथकांची संख्या वाढल्याचे चित्र दिसत होते. दहीहंडी उत्सवाच्या पुर्वसंध्येला रघुनाथनगर येथे मराठी कलाकारांची सेलिब्रेटी हंडी साजरी करण्यात आली. त्यास या परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. गुरुवारी सकाळी गल्लीतली हंडी फोडून निघालेल्या या मंडळींनी शहरातील प्रत्येक चौकांमध्ये उभ्या राहिलेल्या लाख मोलांच्या हंडय़ा फोडण्याकडे आपला मोर्चा वळवला होता. मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या भागातून मोठय़ा संख्येने गोविंदांनी भरलेले ट्रक, टेम्पो, बस अशा मिळेल त्या वाहनातून गोविंदांचे जथ्थे ठाण्याच्या रस्त्यावर दिसून येत होते.
ठाण्याच्या तलावपाळी परिसरात जांभळीनाका येथे दहीहंडीसाठी मोठी तयारी करण्यात आली होती. तरी दुपापर्यंत या भागात येणाऱ्या गोविंदा पथकांची संख्या कमी होती. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भागात दहीहंडीचा उत्साह दुपारनंतरच सुरू झाला. असे असले तरी या दहीहंडीपासून अवघ्या काही अंतरावरील टेंभीनाका येथील शिवसेनेच्या हंडीत मात्र गोविंदा पथकांचा उत्साह सकाळपासूनच दिसून येत होता. टेंभीनाका येथे गोविंदांच्या सुरक्षेची काळजी घेऊन सगळ्यात वरच्या थराला जाणाऱ्या गोिवदाला दोरीच्या सहाय्याने संरक्षित करण्यात आले होते. पाचपाखाडी येथील संघर्षच्या दहीहंडीत स्पेन, बार्सिलोना आणि परदेशी पाहुण्यांची मोठी रेलचेल या भागांमध्ये होते. या दहीहंडीची मजा लुटण्यासाठी गोविंदापथक रात्रीपासूनच दाखल झाले होते. या ठिकाणी महिला गोविंदा पथकांची संख्या लक्षणीय होती. सहा, सात आणि आठ थरांना दिल्या जाणाऱ्या बक्षिसांमुळे लहान मंडळांची मोठी गर्दी येथे दिसून येत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा