गणपतीच्या आगमनाला आता अवघा आठवडा उरला असून गणेशमंडळांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे. एरवी मुंबईच्या गणेश मिरवणुकीत डीजेच्या थरथराटाचा प्रभाव असतो. पण आता संस्कृती, वेगळेपणा यासाठी ढोल-ताशा पथकांच्या गगनभेदी आवाजात मिरवणूक काढण्याची पद्धत पुण्यापाठोपाठ मुंबईतही रूढ होत आहे. ढोल-ताशांसाठी मुंबईतील मंडळांची मदार खेड, सातारा, अहमदनगर, पुण्यातील ढोल-ताशा पथकांवर असायची, दरवर्षीप्रमाणे त्यांना ‘सुपाऱ्या’ दिल्या गेल्या आहेत. पण त्याचबरोबर आता खुद्द मुंबईतही ढोल-ताशा पथकांची संख्या वाढू लागली असून आता मुंबईतील गणेश मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाच्या बरोबरीने ढोल-ताशांच्या ढणढणाटाचा स्वर टीपेला पोहोचणार आहे.
गणेश मिरवणुकीसाठी मुंबई आणि परिसरात ढोल-ताशा पथकांचा वापर वाढत असला तरी अद्यापही त्यासाठी बाहेर गावच्या पथकांना आमंत्रित करावे लागते. प्रामुख्याने खेड, सातारा, अहमदनगर येथील तरुणांची पथके मुंबईत येतात. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी पथकांचे जथ्थे मुंबईत दाखल होण्यास सुरुवात होते. अनेक पथकांसाठी मंडळांनी आधीच ‘सुपारी’ दिलेली असते. त्यानुसार किमान १५ ते २० हजारांपासून पुढे पथकाच्या आकारानुसार मानधन देऊन या पथकांची नोंदणी झालेली आहे.
* मुंबईत पथकांच्या संख्येत वर्षभरात तिपटीने वाढ
मुंबईत पुण्याच्या तुलनेत ढोल-ताशा पथकांची संख्या कमी असल्याने सार्वजनिक गणेशोत्सवात गणपतीचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्याच्या ढोल-ताशा पथकांना मुंबईत मागणी असायची. मात्र यंदाच्या वर्षी मुंबईतील ढोल-ताशा पथकांच्या संख्येत चांगली वाढ झाली असून मुंबईतील सार्वजनिक गणपतींचे आगमन मुंबईकर ढोल-ताशा पथकांच्या साथीने होणार आहे. गेल्या वर्षी मुंबईत पाच ते सात ढोल-ताशा पथके होती. यंदाच्या वर्षी त्यात चांगली वाढ झाली असून ही संख्या १५ ते २० च्या घरात पोहोचली आहे. डीजेचा दणदणाट आणि अचकट-विचकट नृत्य यात गुरफटून गेलेल्या गणेशोत्सवातील मिरवणुकांचे चित्र पालटण्यासाठी, मिरवणुकीत शिस्तबद्धता आणण्यासाठी आणि आपली संस्कृती जपण्यासाठी ढोल-ताशा पथकांचा उपयोग होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आवाजाचा विचार केला तर डीजेंच्या दणदणाटाऐवजी ढोल-ताशांची ढम-ढम इतकाच फरक लोकांसाठी असणार आहे.
* पुण्याच्या पथकांकडून दीक्षा
मुंबईतील ‘मोरया-ढोल ताशा पथका’ने पुण्याच्या प्रसिद्ध ‘नादब्रह्म’ या ढोल-ताशा पथकाकडून धडे गिरविले आहेत. शिस्तबद्ध आणि लयबद्ध मिरवणूक हे या ढोल पथकाचे खास वैशिटय़
यंदाच्या वर्षी ‘लालबागच्या राजा’च्या पाद्यपूजन सोहळ्यात पहिल्यांदा ढोल-ताशा पथकाचे वादन करण्यात आले आणि वादन करण्याची संधी या पथकाला मिळाली. या पथकाने गेल्या वर्षी परळ,  विलेपार्ले, चुनाभट्टी, वांद्रे येथे गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा पथकाचे वादन केले होते. या ढोल-ताशा पथकात ४० ते ५० ते सदस्य असून ते सर्व उच्चशिक्षित आहेत. हौस म्हणून आणि परंपरेची जपणूक, जतन आणि संवर्धन याला चालना मिळावी म्हणून ते पथकात सहभागी होतात. आगमन किंवा विसर्जन मिरवणुकीत या पथकात सहभागी असलेल्यांचा पांढरा लेंगा/सलवार, झब्बा आणि भगवा फेटा असा गणवेश असतो. यंदाच्या वर्षी आम्ही ‘भजनी ताल’ वाजविण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती पथकाचे पदाधिकारी प्रसाद पारकर यांनी दिली.
* घरगुती गणपतीच्या मिरवणुकीचा गोंगाट
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात घरगुती गणरायाचे आगमन आणि त्याला निरोप ढोल-हलगीच्या गजरात करण्याची पद्धत गेल्या काही वर्षांत चांगलीच वाढली आहे. आपला गणपती कसा दणक्यात आला वा गेला हे ‘दाखवण्या’चा सोस वाढला अहे. गणपतीसोबत घरातल्यांपेक्षा हलगीवाल्यांची संख्या जास्त असेही चित्र बऱ्याचदा दिसते. या ढोल-हलगीवाल्यांना ‘जोरात वाजवा..’ असा आदेश दिला जातो व त्यासाठी ठरलेल्या मानधनापेक्षा ५०-१०० रुपये जास्तीची नोट दाखवली जाते. मग वाजवणारेही गणपती घराजवळ आला की इमारतीत शिरण्याआधी सोसायटीच्या आवारात पाच-दहा मिनिटे या वाद्यांना अक्षरश: बडवून काढतात आणि त्या गोंगाटाचा प्रचंड त्रास इतरांना होतो. संस्कृतीच्या नावाखाली ही विकृत मानसिकता दिवसेंदिवस फोफावत आहे.
* चामडे आणि फायबर
ढोल-ताशांवरील आवरण हे चामडे किंवा फायबरचे असते. चामडय़ाचे ढोल-ताशे असतील तर त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्याला अजिबात पाणी लागून चालत नाही. चुकून जरी पाण्याचा स्पर्श झाला तरी ते खराब होऊन त्याचा परिणाम ढोल-ताशांच्या आवाजावर होतो. चामडय़ाचे आवरण असलेले ढोल-ताशे तयार करण्याचा खर्चही जास्त असतो. त्यामुळे ज्या ढोल-ताशा पथकात चामडय़ाचे आवरण असलेले ढोल-ताशे वापरले जातात त्या पथकाचे मानधन जास्त असते. तर फायबरचे आवरण चामडय़ाच्या तुलनेत स्वस्त आणि टिकाऊ असल्याने अनेक जणांचा कल फायबर वापरण्याकडेच असतो. साहजिकच ज्या पथकात फायबरचे ढोल-ताशे असतील त्या पथकाचे मानधन कमी असते. फायबर आणि चामडय़ाच्या ढोल-ताशाच्या आवाजतही फरक असतो, अशी माहिती मुंबईतील एका ढोल-ताशा पथकाकडून देण्यात आली.
* २५ हजारापासून ते लाखापर्यंत मानधन
ढोल-ताशा पथकातील ढोल-ताशा आणि टोल यांच्या संख्येवर आणि मिरवणूक किती वेळ चालणार आहे, त्यावर ढोल-ताशा पथकाचे मानधन ठरविण्यात येते. मानधनाची ही रक्कम २५ हजार ते १ लाख रुपये किंवा त्यापुढेही असू शकते. दहा ढोल-ताशांपासून ३० किंवा त्यापुढे ही संख्या असू शकते. गणेश मंडळाच्या मागणीनुसार पथकातील वाद्यांची, वादकांची संख्या ठरवली जाते आणि त्यानुसार मानधनाचा आकडा ठरतो.