डोंबिवली येथील ज्ञानप्रबोधिनीच्या केंद्रामार्फत १६ सप्टेंबर रोजी बहर जोपासताना या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. वाढीच्या वयातल्या आपल्या मुलांसोबत कसा सुसंवाद साधावा याविषयीचे मार्गदर्शन केले जाणार आहे. आजच्या विभक्त कुटुंबपद्धतीच्या काळात पालकांपुढे नव्या युगाची म्हणून काही नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. या आव्हानांना सामोरे कशा प्रकारे जावे आणि त्याचसोबत मुलांशी सुसंवाद कसा साधावा, असा यक्ष प्रश्न पालकांपुढे ठाकला आहे. त्याचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात डोंबिवली येथील ज्ञानप्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी पालक मंडळातर्फे रुजुवात केली. पालक आणि मुलांमधील नात्याची वीण सुसंवादामार्फत अधिक घट्ट कशी करता येईल हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू झालेल्या या पालक मंडळाची दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी संध्याकाळी दोन तास बैठक होते. या बैठकीत पालक आणि मुलांमधील विविध नात्यांच्या पैलूंवर चर्चा करण्यात येते. यामध्ये वयात येणाऱ्या आपल्या पाल्याशी कशा प्रकारे संवाद साधावा तसेच पौंगडावस्थेच्या उंबरठय़ावर असलेल्या मुला-मुलींमध्ये जे शारीरिक बदलांविषयी मोकळेपणी कसे बोलावे तसेच तारुण्यावस्थेतील आपल्या मुलांशी नेमका संवाद कशा प्रकारे साधावा अशा पालकांना अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा विविध विषयांवर या पालक मंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होते. यातील चर्चामधून मिळणाऱ्या मार्गदर्शनातून पाल्यासोबतचे पालकत्वाचे नाते अधिक प्रगल्भ होण्यास मदत होते असा अनुभव या मंडळातील सभासदांना येत आहे. हा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या प्रगल्भ पालक मंडळींसाठी पालक मंडळातर्फे १६ सप्टेंबर रोजी बहर जोपासताना या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याच वेळी पालक मंडळाच्या तिसऱ्या वर्षांसाठी नवीन सदस्य नोंदणीही करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत तसेच पालक मंडळाच्या बैठकीत आई आणि बाबा अशा दोघांनी सहभागी होणे अपेक्षित आहे. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी स्मिता चावरे (९९३०१४५२११) आणि श्रुती फाटक (९९३०१०२९९८) यांच्याशी संपर्क साधावा.

Story img Loader