अमेरिकेच्या कॉन्सुलेट जनरलपदी नियुक्ती झालेले कोल्हापूर जिल्हय़ाचे सुपुत्र ज्ञानेश्वर मुळे यांचा नागरी सत्कार शनिवार १३ एप्रिल रोजी केशवराव भोसले नाटय़गृह येथे सायंकाळी करण्यात येणार आहे, अशी माहिती चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने निमंत्रक आनंद माने यांनी येथे दिली.    
मुळे यांचा सत्कार नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांच्या हस्ते व अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार सदाशिवराव मंडलिक, खासदार राजू शेट्टी, आमदार सा.रे.पाटील, आमदार महादेवराव महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुजित मिणचेकर, आमदार विनय कोरे, आमदार के.पी.पाटील, माजी आमदार पी.एन.पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, महापौर जयश्री सोनवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक, कुलगुरू डॉ. एन.जे.पवार, संजय डी. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे आदी उपस्थित राहणार आहेत.    
या सत्कार समारंभाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर मुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपला पारंपारिक सत्कार समारंभ न होता माझ्याकडून सन २०२० सालापर्यंत कोल्हापूर परिसराच्या सर्वागीण विकासासाठी करवीरकरांच्या कोणत्या अपेक्षा आहेत? व मी माझ्या परिसरासाठी काय योगदान देऊ शकतो? याबाबतीत स्थानिक उद्योजक, व्यावसाायिक तसेच नागरिक यांच्याकडून सूचना मागवून घेण्याबद्दल त्यांनी सुचविले.    
ज्ञानेश्वर मुळे हे एक ख्यातनाम साहित्यिकही आहेत. तसेच त्यांच्याकडून स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या युवक, युवतींनाही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळत असते. या कार्यक्रमास युवक व युवतींनी उपस्थित राहून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये कॉन्सुलेट जनरलपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यामार्फत या परिसरातील उद्योग, व्यापार, शेती व पर्यटन या क्षेत्रात विकासासाठी मोठय़ा संधी निर्माण होऊ शकतात.

Story img Loader