‘‘राज्यात अनेक ठिकाणी नाटकांचे प्रयोग करता येतात, पण जिथे रंगकर्मी आनंदाने नाटक करू शकतील आणि प्रेक्षक ते आनंदाने बघू शकतील अशी नाटय़गृहे केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहेत. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात जाणारा तरुण वर्ग नाटय़गृहांतील असुविधेमुळे नाटकांकडे वळत नाही. नाटय़प्रयोगांची संख्या कमी व्हायचे कारणही हेच आहे,’’ असे मत अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.
‘रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊन’ तर्फे दामले यांना ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे आणि बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते ‘व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊनचे अध्यक्ष राजकुमार तांबे या वेळी उपस्थित होते.
दामले म्हणाले, ‘‘चिपळूणला नाटय़गृह आहे पण खुच्र्या नाहीत. परभणीला स्टेजवर पाय ठेवला की फळी खाली जाते. पुण्यातील नाटय़गृहांत प्रेक्षकांसाठी असलेल्या प्रसाधनगृहांपेक्षा कलाकारांसाठीची प्रसाधनगृहे घाणेरडी आहेत. नाटक बघायला खुर्चीत बसल्यावर खिळा लागून पँट फाटत असेल तर मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट बघणारा तरुण या नाटय़गृहांत शिरण्यास धजावणारच नाही. या कारणांमुळेच नाटय़प्रयोगांची संख्याही कमी होते आहे. राज्यातील महत्त्वांच्या शहरांत तरी उत्तम नाटय़गृहे हवीतच.’’ मोघे यांनी त्यांचा नाटय़प्रवास उलगडताना पु. ल. देशपांडे यांच्या काही रंजक आठवणीही सांगितल्या.

Story img Loader