जिल्हा सहकारी बँकेच्या एक लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या आतापर्यंत आठशे शेतकऱ्यांना पोलिसांचे विशेष दल पाठवून अटक करण्यात आली. मात्र, राष्ट्रवादीच्या दोन आमदारांसह बडय़ा नेत्यांविरुद्ध कर्जप्रकरणात गुन्हा दाखल होऊन महिना लोटत आला, तरी अजून एकालाही अटक का झाली नाही? पोलिसांना रातआंधळेपणा झाला का? सर्वाना समान न्याय देण्यात गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पोलीस दलाने विश्वास गमावला. त्यामुळे या गुन्हय़ांचा तपास केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) कडे द्यावा. आष्टी दूध संघाच्या कर्ज परतफेड प्रकरणाची चौकशी करून सहकार राज्यमंत्री सुरेश धस यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली.
राज्य ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार व मुकादम संघटनेचा मेळावा मुंडे यांच्या उपस्थितीत झाला. आमदार पंकजा पालवे, माजी आमदार पाशा पटेल, केशवराव आंधळे, संघटनेचे गोरक्ष रसाळ, बाबासाहेब बांगर आदी उपस्थित होते. खा. मुंडे यांनी ऊसतोड मजुरांच्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक विचार करून मान्य कराव्यात. पुढच्या वर्षी सरकार साखर कारखानदार व मजूर यांच्यातील करार संपत असल्याने संपाची वेळ आणू नये, असा इशारा दिला. त्यानंतर मात्र खा. मुंडे यांनी जिल्हा बँकेच्या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली.
बँकेत मागील दोन वर्षांत प्रशासकाने एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या तब्बल एक हजार शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले. गुन्हा दाखल होताच विशेष पोलीस दल पाठवून गावंधरा, चिखलबीड आदी गावातील शेकडो शेतकऱ्यांना अटक केली. आतापर्यंत आठशे शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. मात्र, िदडीच्या सभेत प्रशासकाच्या भूमिकेबद्दल आपण आवाज उठवल्यानंतर २५ दिवसांपूर्वी बडय़ा थकबाकीदार कर्जदारांविरुध्द गुन्हे दाखल झाले. यात राष्ट्रवादीचे दोन आमदार व डझनभर दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. आपल्याविरुध्दही गुन्हा दाखल करण्याचे षड्यंत्र रचले होते. मात्र, त्यात राष्ट्रवादीचेच नेते अडकले आहेत. गुन्हा दाखल होऊन महिना लोटला, तरी अजून पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नाही.
प्रशासकांनी सर्वाना समान न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करून राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांच्या जयभवानी व इतर संस्थांकडे २२ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे. त्यांच्यावर गुन्हा का नाही? आष्टी तालुक्यातील सूतगिरणीच्या सर्व संचालकांवर गुन्हा दाखल केला, पण गेवराईच्या माऊली सूतगिरणीच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हा दाखल करून संचालकांना वाचवण्यात आले. हा दुजाभाव सहन करणार नाही. असा इशारा देऊन आष्टी दूध संघाकडे अडीच कोटी रुपये थकीत कर्ज होते, या कर्जाची परतफेड करताना तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या ठेवी परत घेऊन हे कर्ज फेडण्यात आले. नियमाने असे करता येत नाही. त्यामुळे या कर्ज परतफेड प्रकरणाची चौकशी करून यात दोषी असलेल्या राज्यमंत्री धस यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली.
पंकजा पालवे, पाशा पटेल, केशवराव आंधळे यांची भाषणे झाली. मेळाव्याला मोठय़ा संख्येने गर्दी जमल्याने मुंडेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले
अजित पवार, पुतण्यावर टीका!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा थेट उल्लेख करून आपल्याला पराभूत करण्यासाठी आतापर्यंत २५ बठका घेतल्या. माझ्याबरोबर असणाऱ्या नेत्यांना आमिषे दाखवून बाजारबुजग्यांची फौज तयार केली. मात्र, आपल्याला पराभूत करण्यासाठी अद्याप कोणी जन्मला नाही. पवारांची फौज आता फरारी आहे. ज्यांना आपला वारसा चालवण्याची संधी दिली, ते बेईमान होऊन पळून गेले. पोरगा पळून गेल्याने पोरीला पुढे आणावे लागले, अशा शब्दांत त्यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला. आमदार पंकजा पालवे यांनी बारामतीत मेळावा घेऊन पवारांशी संघर्ष पुकारल्याचा सर्वाधिक आनंद झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader