शेतीतील उत्पादित मालाच्या खरेदी-विक्रीसाठी बाजार समित्यांची स्थापना झाली आहे. शेतकरी व व्यापारी यांचा सहभाग घेऊन शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळविण्यासाठी द्राक्ष व आंबा उत्पादन निर्यात करावा. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ मिळून अधिक उन्नती होईल, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती, मुरूम, ता उमरगा येथील माधवराव पाटील व्यापारी संकुलाचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार बसवराज पाटील, शैलेश पाटील, प्रदीप राठी, माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष व्हट्टे, कृषी उत्पन्न पाजार समितीचे सभापती बापूराव पाटील, मुरूम नगर परिषदेचे नगराध्यक्ष व्यंकट जाधव आदींची उपस्थित होती.
राज्यपाल पाटील म्हणाले की, व्यापारी संकुलला माधवराव पाटील हे नाव दिले. त्यांचे नाव व कार्याची आठवण सर्वाना निरंतर स्मरणात राहील. सर्वांनी त्यांची प्रेरणा घेऊन काम केले तर अतिशय वेगाने काम होईल. व्यापारी संकुल चांगल्या दर्जाची बांधली असून या भागातील दुकानदार-व्यापारी विविध चांगले व्यवसाय सुरू करतील. या कामाबरोबरच सिंचन, रायायनिक खते, कृषी विश्व विद्यालय, राष्ट्रीय स्तरावरील संशोधन शाळा उभारणीसाठी प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषण करताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पिण्याच्या पाण्यासाठी उस्मानाबादकरांना खास बाब म्हणून ५१ कोटी रुपये मंजूर केले होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. सहकार क्षेत्रातील बंद पडलेले साखर कारखाने सहकारी तत्त्वावरच चालू देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे सांगितले. सहकार क्षेत्रातील चळवळीचे महत्त्व कमी होणार नाही, यासाठी सहकार कायद्यात नव्या सुधारणा करण्याचा निर्णयही झाला असून त्यावर पुढील अधिवेशनात चर्चा होणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती असून त्यांच्या शेतीतील मालाच्या विक्रीला योग्य भाव मिळण्याकरिता प्रस्ताव सादर करावेत. दुष्काळात जनावरांचे संगोपन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. या भागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी व शेतीच्या विकासासाठी रोजगार हमी योजना, शेततळे व पाझर तलावाची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, बाजारपेठ वृद्धिंगत करण्यासाठी विश्वासार्हता महत्त्वाची आहे. माधवराव पाटील यांनी केलेल्या सहकार क्षेत्रातील कामाची त्यांनी आठवण करून दिली. या भागात बाजार समिती, शिक्षण व पाण्याबाबतच्या केलेल्या कामाचे कौतुक केले. उस्मानाबाद शहर टँकरमुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगून तुळजाभवानी कारखाना व जिल्हा बँकेच्या विकासासाठी सहकार मंत्र्यांनी सर्वतोपरी मदत करण्याची विनंती केली.
आमदार बसवराज पाटील म्हणाले की, रोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने शेतकरी-व्यापारी यांनी सोयीने व्यवसाय करण्यासाठी या व्यापारी संकुले तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे विकास होणार असून बाजार समितीचा कायापालट होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा