स्कूलबसमध्ये विद्यार्थिनीशी गैरप्रकार झाल्यानंतर सुरू झालेला आरोप-प्रत्यारोपांचा आणि जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा खेळ तातडीने थांबायला हवा. अशी एकमेकांवर जबाबदारी ढकलून काहीच साध्य होणार नाही. पोलीस, शाळा व्यवस्थापन, कायदा कुठेकुठे पुरे पडणार. ज्या कर्मचाऱ्याने हा प्रकार केला तो कित्येक वर्षांपासून बसवर काम करत होता. त्याच्याबद्दल तोवर काही तक्रारी नव्हत्या. विकृती उफाळून आल्याने त्याने हे घृणास्पद कृत्य केले. बसमध्ये अशी घटना घडत असेल तर ती जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर किंवा प्राचार्यावर कशी टाकता येईल. बसचा मालक तरी या प्रकरणी कसा दोषी धरणार. कोणाच्याही चेहऱ्यावरून तो असा काही वागेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तींना धडा शिकवणे, त्यांना कठोर शिक्षा होणे, त्यांचा चेहरा समाजासमोर येणे गरजेचे आहे. अशा लोकांचा चेहरा लपवल्याने उलट ते अज्ञात राहतात. लोकांना त्यांचे खरे रूप समजत नाही. अशा प्रकरणात पोलिसांनी पकडले की ‘गावाला गेला आहे’ अशी थाप मारत कुटुंबातील सदस्य वेळ मारून नेतात. या उलट अशा लोकांचे फोटो प्रसिद्ध केले, त्यांचा चेहरा समाजासमोर आला की समाजात, घरी आई-वडील, पत्नी, मुलगा-मुलगी यांच्यासमोर त्यांची छी थू होईल, त्यांना कुठेही थारा मिळणार नाही. त्यांना कठोर शिक्षा आणि सामाजिक नामुष्की याची जरब-भीती बसली पाहिजे. अशा गुन्ह्यात फार शिक्षा होत नाही, या भावनेतूनच अशा विकृत माणसांची भीड चेपली आहे. कठोर शिक्षा आणि सामाजिक नामुष्कीमुळे आपल्याबरोबरच कुटुंबही आयुष्यातून उठण्याची भीती बसली तरच अशा प्रकारांना आळा घालता येईल. अनिल गर्ग, स्कूल बसचालक संघटनेचे नेते.

Story img Loader