पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्यातून पाणीउपसा करणाऱ्या परवानाप्राप्त शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा बंद करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदा आहे. जिल्हा प्रशासनाने वीजपुरवठा तोडण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली.
ढालेगाव बंधाऱ्यातून पाणीउपसा करणाऱ्या शेतकऱ्यांची वीज खंडित करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी परवानगी घेतली, त्यांची वीज खंडित करता कामा नये.
शेतकऱ्यांनी बियाणे, खते तसेच मोटर पाईपलाईनसाठी लाखोंची गुंतवणूक केली. असे असताना रब्बी हंगामातील पिके निघेपर्यंत सरकारने कृषीपंपाची वीज तोडू नये, अशी मागणी भाकपच्या वतीने करण्यात आली. पक्षाचे जिल्हा निमंत्रक कॉ. राजन क्षीरसागर, कॉ. मुंजा लिपणे, सखाराम मगर, शाळीग्राम लिपणे, पंढरीनाथ लिपणे, मधुकर काजळे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात निवेदन दिले. जिल्हा प्रशासनाने जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्याचा कोणताही विचार न करता शेतकऱ्यांविरुद्ध पोलिसी बळाचा वापर करून कृषीपंपांचा वीज तोडण्याची कारवाई चालवली आहे, त्यास आम्ही ठाम विरोध करू, असे निवेदनात म्हटले आहे.

Story img Loader