धोरण ठरवणारे राज्यकर्ते व त्याची अंमलबजावणी करणारी प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची यंत्रणा हे दोघेही पुरोगोमी विचारांचे असतील तरच राज्य ताकदवान होईल, राज्याचे किंवा देशाचे विभाजन करणारे नेतृत्व नको यासाठी वातावरणनिर्मिती करण्याची जबाबदारी ‘कास्ट्राईब’ने स्वीकारावी, अशी अपेक्षा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन आज नगरमधील नंदनवन लॉन्समध्ये आयोजित करण्यात आले होते, त्याच्या उद्घाटनप्रसंगी थोरात बोलत होते. अधिवेशनास मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचे महासंघाने जाहीर केले होते, परंतु ते अनुपस्थित होते. अधिवेशनास अपेक्षित प्रतिसादही मिळाला नाही.
कास्ट्राईबने सन २०१४ मध्येही पुरोगामी विचारांना साथ द्यावी, असे आवाहन करून थोरात यांनी संघटनेस अंतर्गत मतभेद मिटवण्याची तसेच समाज व संघटना यांच्यातील अंतर न वाढवता वाटचाल करण्याची सूचना केली. संघटनेच्या वतीने थोरात यांना २१ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्या सोडवण्याचेही त्यांनी मान्य केले.
राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा राज्याच्या विकासात मोठा वाटा आहे, राज्यकर्त्यांचा कालखंड ठरलेला असतो, त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागते, बहुमत मिळवावे लागते, नाहीतर घरी बसावे लागते, शिवाय पक्षसंघटना, मतदारसंघ, कार्यकर्ते यांनाही सांभाळावे लागते, मित्रपक्षाबरोबर आणि पक्षांतर्गतही भांडावे लागते यातून वेळ मिळाला तर राज्याचे निर्णय घेतले जातात, म्हणून राज्यकर्त्यांची धोरणे योग्य पद्धतीने राबवली गेली तर व त्याची अंमलबजावणी होताना पुरोगामी विचार असेल तरच राज्य किंवा देश ताकदवान होतो, विभाजन करणारे नेतृत्व नको यासाठी वातावरणनिर्मिती करण्याची जबाबदारी संघटनेवर आहे, असे थोरात म्हणाले.
आ. डॉ. सुधीर तांबे यांचेही भाषण झाले. संघटनेचे राज्य अध्यक्ष अरुण गाडे यांनी मुंबईत संघटनेच्या कार्यालयास मंत्रालयाशेजारी जागा मिळावी, अशी मागणी केली. अतिरिक्त महासचिव विलास बोर्डे यांनी प्रास्ताविकात संघटनेचे अस्तित्व केवळ अनुशेषाची आकडेवारी जमा करण्यापुरते राहिले आहे, त्यासाठी संघटनेस सरकारने सेवायोजनाचा अधिकार पुन्हा द्यावा, नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा देण्याची मागणी केली. जिल्हाध्यक्ष गुणवंत खुरंगळे यांनी स्वागत केले. संघटनेचे पदाधिकारी बी. के. घोडेराव, हर्षवर्धन सोनवणे, डॉ. हरिश्चंद्र रामटेके, प्राचार्य म. ना. कांबळे, इंद्रजित शिंदे, अमृत बनसोड, कमलाकर म्हस्के तसेच राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्याचे विभाजन करणारे नेतृत्व नको- थोरात
धोरण ठरवणारे राज्यकर्ते व त्याची अंमलबजावणी करणारी प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची यंत्रणा हे दोघेही पुरोगोमी विचारांचे असतील तरच राज्य ताकदवान होईल, राज्याचे किंवा देशाचे विभाजन करणारे नेतृत्व नको यासाठी वातावरणनिर्मिती करण्याची जबाबदारी ‘कास्ट्राईब’ने स्वीकारावी, अशी अपेक्षा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज व्यक्त केली.
First published on: 30-12-2013 at 02:08 IST
TOPICSलीड
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not lead to a partition of the state thorat