स्वार्थी लोकांनी सहकारी साखर कारखान्यांना राजकारणाचा अड्डा बनविला आहे. त्यांना तो अड्डा बनवू देऊ नका, असे आवाहन करीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांच्यावर टीका केली.
हदगाव तालुक्यातील हुतात्मा जयवंतराव पाटील सहकारी साखर कारखाना अलीकडेच भाऊराव चव्हाण कारखान्याने विकत घेतला. कारखाना परिसरात आयोजित शेतकरी मेळाव्यात चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार विजय खडसे, माधवराव पाटील जवळगावकर, अमरनाथ राजूरकर, जि. प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, कार्यकारी संचालक बी. डी. औताडे उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले की, मागील अनेक निवडणुकांसाठी मी हदगाव तालुक्यात आलो, अनेक सभाही घेतल्या; परंतु एवढी प्रचंड गर्दी असलेली सभा उत्स्फूर्तपणे होत आहे, हे मी पहिल्यांदाच अनुभवतो आहे. ‘स्वत:चे पाप लपविण्यासाठी या कारखान्याच्या संस्थापक अध्यक्षांनी माझ्यावर बेछूट आरोप केले. ‘हुतात्मा’वर ७८ कोटींचे कर्ज झाले. जास्त कर्ज झाल्यामुळे हा कारखाना बंद पडला. बंद पडलेला कारखाना सुरू करण्याऐवजी सूर्यकांता पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने ४ डिसेंबर २०१० रोजी ठराव घेऊन कर्जात पूर्णपणे बुडालेला हा कारखाना विक्री करण्याची विनंती राज्य सहकारी बँकेला केली. त्यानंतर राज्य सहकारी बँकेने कारखाना विक्रीची जाहिरात दिली. विक्रीसाठी टेंडर मागविले. सर्वाधिक किमतीचे टेंडर ‘भाऊराव’ने भरले. त्यामुळे तो कारखाना राज्य सहकारी बँकेने ‘भाऊराव’ला दिला. त्यानंतरही सूर्यकांता पाटील यांनी वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये आम्हाला कारखाना मिळू नये म्हणून लढाई केली; परंतु उच्च न्यायालयाच्या निकालानुसार आम्ही हा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी विकत घेतला. त्यामुळे त्यांनी केलेले माझ्यावरील आरोप निराधार व वस्तुनिष्ठेला धरून नाहीत. उलट त्यांनी त्यांच्या या न्यायालयीन लढाईमुळे या वर्षीचे गाळप होऊ शकले नाही. ज्या शेतकऱ्यांनी आपला ऊस देऊन हा कारखाना चालविला, त्याच शेतकऱ्यांच्या घामातून तयार झालेली साखर इथल्या गोदामातून चोरीला जाते, एवढी गंभीर बाब दुसरी कोणतीही असू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा त्यांनी दिली. ज्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत पिठाची गिरणी चालविली नाही, अशी जिल्ह्य़ातील काही मंडळी आम्हाला कारखाना कसा चालवावा याचे डोस पाजवत आहेत. त्यांनी आधी एखादी संस्था नीट चालवून दाखवावी व त्यानंतरच आम्हाला सल्ला द्यावा, असेही ते म्हणाले. लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही पक्षांचे पुढारी कारखान्यात राजकारण आणत आहेत; परंतु मी मात्र या ठिकाणी या कारखान्याला राजकारणाचा अड्डा बनू देणार नाही. प्रास्ताविक अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी, तर सूत्रसंचालन संतोष देवराय यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा