एस. टी.चा प्रवास सुरक्षित आहे. त्यामुळे प्रवाशांनी एस. टी.नेच प्रवास करावा. तसेच एस. टी. रिकामी धावणार नाही, याची काळजी घेऊन प्रवाशांना एस. टी.कडे आकर्षति करण्याचा प्रयत्न अधिकारी-कर्मचाऱ्यांनी करावा, असे आवाहन एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी केले.
वाशी येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या बसस्थानक बांधकामाचे भूमिपूजन रविवारी झाले. शहरातील शिवाजी चौकातील जुन्या बसस्थानक येथे झालेल्या सभेत अध्यक्षस्थानावरून गोरे बोलत होते. खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, तेरणा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, वाशी पंचायत समिती सभापती लक्ष्मीकांत आटुळे, उपसभापती संतोष िशदे, महामंडळाच्या कार्यकारी अभियंता विद्या मेलारकर, प्रादेशिक व्यवस्थापक गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते संतोष कवडे, सुरेश कवडे, काँग्रेसचे वाशी तालुकाध्यक्ष बिभीषण खामकर, नागनाथ नाईकवाडी आदी उपस्थित होते.
कुठपर्यंत चालायचे व कोठे थांबायचे हे ज्यांना कळते, तोच खरा राजकारणी. खासदार डॉ. पाटील सामाजिक बांधिलकी जपणारे नेते आहेत. एका विचारधारेने ते चालतात. विकासकामे करताना साखळी असावी लागते. ही साखळी कायम ठेवण्यासाठी डॉ. पाटील यांच्यामागे आपली ताकद उभी करावी, असे आवाहन गोरे यांनी या वेळी केले. मागील दीड वर्षांत आम्ही कोठेही बसस्थानक बांधकामांना मंजुरी दिली नाही. जिल्ह्यात वाशी व लोहारा या दोनच ठिकाणी बसस्थानक उभारणीस मंजुरी दिली आहे. ही दोन्ही बसस्थानके अद्ययावत राहणार आहेत. येथे सर्व सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
खासदार डॉ. पाटील यांचेही भाषण झाले. आमदार मोटे यांनी विकासकामांचा आढावा घेतला. उपसरपंच सुरेश कवडे, बिभीषण खामकर, प्रसाद जोशी यांनीही विचार मांडले. प्रा. समाधान माने यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमास काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Story img Loader