विविध प्रकल्पांत जमीन संपादन केलेल्या प्रकल्पग्रस्तांचे ‘आदर्श’ पुनर्वसन होईल यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोसेखुर्द व मिहान प्रकल्पांच्या पुनर्वसन कामाचा आढावा घेताना अधिकाऱ्यांना दिले.
राजीव गांधी जीवनदायी योजनेचा शुभारंभाचा कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गुरुवारी रात्री मुंबईला रवाना झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा नागपूरला आले. त्यावेळी गोसीखुर्द आणि मिहान प्रकल्पासंबंधी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून या कामात गती आणण्याचे निर्देश दिले. यावेळी विभागीय आयुक्त बी.व्ही. गोपालरेड्डी यांनी गोसीखुर्द व मिहान प्रकल्पांच्या पुनर्वसन कामाची माहिती मुख्यमंत्र्यांना सादरीकरणाव्दारे दिली.
गोसीखुर्द पाटबंधारे प्रकल्पातील ८५ बाधित गावापकी ८२ बाधित गावातील प्रकल्पग्रस्तांना देय लाभाच्या माहितीचे एकत्रित माहितीचे रजिस्टर तयार करण्यात आले आहे. उर्वरित ३ बाधित गावातील प्रकल्पग्रस्तांना देय लाभाच्या माहितीचे एकत्रिकरण करण्याचे काम सुरू आहे. ८२ बाधित गावापकी ५५ बाधित गावांच्या माहितीचे प्रमाणिकरण करण्यात आले असून, उर्वरित २७ गावातील देयक लाभाच्या माहितीचे प्रमाणिकरण करण्याचे काम सुरु आहे. ५५ बाधित गावांपकी ४४ गावातील प्रकल्पग्रस्तांना देय लाभाकरिता आतापर्यंत ४८५ शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. ४४ बाधित गावठाण्यातील ७ हजार ६२४ कुटुंबापकी ७ हजार ३०६ कुटुंबाची २८०.४५ कोटी रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. ४४ बाधित गावातील शेतजमिनीचे ४ हजार ९६९ खातेदारांपकी ४ हजार ४२८ खातेदारांची ८४.७९ कोटी रुपयाची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. आतापर्यंत ११ हजार ७३४ प्रकल्पग्रस्तांची ३६५.२४ कोटी रुपयाच्या देय लाभाची प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यांना देय रक्कम वाटप करण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत १२२.२७ कोटी रुपयाचे वाटप करण्यात आले, अशी माहिती बी.व्ही. गोपालरेड्डी यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिली.  
पहिल्या टप्प्यातील एकूण १८ गावापकी १२ गावे स्थलांतरित झाली आहे. उर्वरित गावापकी पाथरी, जिवनापूर या गावातील प्रकल्पग्रस्तांना पॅकेजची रक्कम वाटप करण्यात आली आहे. मात्र प्रकल्पग्रस्त अद्याप स्थलांतरित न झाल्याने अन्य कार्यवाहीचे पर्याय शोधण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्य़ातील ८ हजार ३४८ प्रकल्पग्रस्त कुटुंबापकी पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील एकूण २ हजार २५० प्रकल्पग्रस्त कुटुंबे स्थलांतरित झाली आहे. तर भंडारा जिल्ह्य़ातील ६ हजार ६३६ प्रकल्पग्रस्त कुटुंबापकी पहिल्या टप्प्यातील ५४३, दुसऱ्या टप्प्यातील १ हजार ५६९ तर तिसऱ्या टप्प्यातील ५७५ असे एकूण २ हजार ६८७ प्रकल्पग्रस्त कुटुंबे स्थलांतरित झाली असल्याचे गोपालरेड्डी यांनी सांगितले.  
मिहान प्रकल्पाच्या पुनर्वसन कामासंदर्भात आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी नवीन मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन संपादन करताना जी पध्दत अवलंबिली आहे, त्याचा अभ्यास करून गोसीखुर्द व मिहान प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी उपयोग करावा, असे निर्देश दिले. अधिवेशन काळात मिहान व गोसीखुर्द प्रकल्पाला भेट देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मिहान प्रकल्पांतर्गत शिवणगाव वगळता सर्व बाधित गावातील बाधित कुटुंबातील यादी अंतिम झाली आहे. खापरी रेल्वे येथील भूखंड व घरे वाटपाबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करून येत्या १५ डिसेंबर २०१३ पर्यंत भूखंड व घराचे वाटप करण्यात येईल.  
शिवणगाव शहरी भागाचे पुनर्वसन चिंचभवनला करण्यात येत आहे. तेथे नागरी सेवा विकसित करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. कामाचे अंदाजपत्रक ३० डिसेंबर २०१३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. कंत्राटदाराची नियुक्ती ३० मार्च २११४ पर्यंत करण्यात येईल व कामे ३०जून २०१५ पर्यंत पूर्ण करण्यात येतील. भूखंड वाटपाची यादी ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती गोपालरेड्डी यांनी दिली. या बैठकीला वित्त व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त श्याम वर्धने, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक पी.सी. झपके, उपायुक्त एम.एच. खान, मिहानचे मुख्य अभियंता एस.व्ही. चहांदे, प्रकल्प अधिकारी आबिद रुही उपस्थित होते.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा