तिसऱ्या अपत्याच्या मृत्यूचा खोटा दाखला तयार करून महापालिकेची फसवणूक केल्यावरून नगरसेवकपद रद्द झालेल्या अनिल गणपत शेकटकर यांना त्याच कारणावरून कोतवाली
पोलिसांनी आज पहाटे अटक केली. त्यांना या गुन्ह्य़ात साथ देणाऱ्या डॉ. दिलीप पवार यांनाही अटक झाली. शेकटकर अपक्ष म्हणून निवडून आले होते.
दोघांनाही पोलिसांनी आज न्यायालयासमोर नेले असता न्यायाधिशांनी त्यांना सोमवापर्यंत (दि.१०) पोलीस कोठडी दिली. मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी त्यांच्याविरोधात गुरूवारी रात्री फिर्याद दाखल केली
आहे.
शेकटकर यांचे नगरसेवकपद याच कारणावरून न्यायालयाने रद्द केले आहे, त्याविरोधात त्यांनी खंडपीठात अपील केले असले तरी त्यांना नगरसेवक म्हणून मनपाच्या कामकाजात भाग घ्यायला मनाई करण्यात आली आहे. फिर्याद दाखल करण्यापूर्वी मनपाच्या वतीने जन्म-मृत्यू विभागाच्या राज्याच्या प्रमुख निबंधकांचा सल्ला घेण्यात आला
होता.
तिसरे अपत्य असतानाही त्यांनी त्याच्या मृत्यूचा खोटा दाखला तयार करून तो मनपाला सादर केला व निवडणूक लढवली. त्यांचे प्रतिस्पधी पराभूत उमेदवार दिप चव्हाण यांनी त्यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला. त्यात शेकटकर यांनी तिसऱ्या अपत्याच्या मृत्यूचा खोटा दाखला तयार केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले. त्यानंतर आता मनपाची फसवणूक झाल्याची फिर्याद आरोग्य
अधिकारी डॉ. राजूरकर यांनी दाखल केल्याने त्यांच्यावर आज पोलिसी कारवाई झाली.