रायमोहा ग्रामीण आरोग्यास ग्रामस्थांनी टाळे ठोकताच तेथे लगेच डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली. सरपंच प्रा. मदन जाधव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी हे आंदोलन केले.
शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा येथे हे ग्रामीण रुग्णालय आहे. रुग्णालयात मंजूर २६ पदांपैकी केवळ २१ कर्मचारीच कार्यरत आहेत. त्यातही वैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर, तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वर्ग १ व वर्ग २ च्या तीन कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. रुग्णालय चालवणारी प्रमुख पदेच रिक्त असल्याने उर्वरित संवर्गातील कर्मचाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण नाही. या बाबत वारंवार मागणी केल्यानंतरही प्रमुख रिक्त पदे भरण्याबाबत टाळाटाळ केली जाते. कर्मचाऱ्यांबरोबर औषधांचाही तुटवडा असल्यामुळे काही दिवसांपूर्वी नोटीस देऊन कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे रविवारी सरपंच मदन जाधव व ग्रामस्थांनी रुग्णालयास कुलूप ठोकले. त्यानंतर काही काळाने जिल्हा शल्यचिकित्सक व पोलीस उपअधीक्षक संभाजी कदम यांनी मध्यस्थी केल्यानंतर तत्काळ एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली व सायंकाळी रुग्णालयाचे कुलूप उघडण्यात आले.

Story img Loader