‘मकृवि’चा उद्या पदवीदान समारंभ
मराठवाडा कृषी विद्यापीठातील बीज प्रक्रिया केंद्र, वस्त्र प्रावरनिक उत्पादन केंद्र, कडधान्ये व तेलबिया प्रक्रिया केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी (दि. २२) केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. किशनराव गोरे यांनी पत्रकार बैठकीत दिली. कुलसचिव के. व्ही. पागिरे, विस्तार संचालक डॉ. अशोक धवण आदी उपस्थित होते.
पदवीदान समारंभात पवार यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’, तर डॉ. कीर्तीसिंग यांना ‘कृषिरत्न’ मानद उपाधीने सन्मानित करण्यात येणार आहे. मराठवाडा विभागातील प्रयोगशील शेतकऱ्यांना ‘एमकेव्ही फेलो’ पुरस्कार देण्यात येणार आहे. या वर्षी बी. बी. ठोंबरे यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात विविध विद्याशाखांमधील १ हजार ६२० स्नातकांना राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यात पीएच. डी.चे १५, पदव्युत्तर अभ्यासक्रम २९९, पदवी अभ्यासक्रमाच्या १ हजार ३०६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. काही शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार तसेच कृषी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विद्यापीठातून प्राध्यापक, संशोधन यांना राधाकृष्ण शांती मल्होत्रा पारितोषिकाने गौरविण्यात येणार आहे. पवार यांच्या हस्ते बीज प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन होणार आहे. या केंद्राचा राष्ट्रीय बियाणे महामंडळ, महाबीज, शेतकरी यांना उच्च दर्जाचे अधिक उत्पन्न देणारे, रोग व किडींना प्रतिकारक्षम प्रतिकूल स्थितीत तग धरणारे विविध पिकांच्या वाणांच्या बियाणांचा पुरवठा करण्यासाठी व कमीत कमी वेळात जास्तीत जास्त बियाणे बीज प्रक्रिया करण्यासाठी उपयोग होणार आहे, अशी माहिती डॉ. गोरे यांनी दिली.