लोणी येथील प्रवरा अभिमत विद्यापीठाचा आठवा पदवीदान समारंभ येत्या सोमवारी (दि. २४) सकाळी आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय आरोग्यमंत्री गुलामनबी आझाद, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणा-या या कार्यक्रमात या तिघांना विद्यापीठाच्या वतीने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
विद्यापीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र विखे यांनी ही माहिती दिली. प्रवरा ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन सुशीलकुमार िशदे व गुलामनबी आझाद यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब विखे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय केळकर, कुलगुरू डॉ. शशांक दळवी आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
राजेंद्र विखे यांनी सांगितले, की या शैक्षणिक वर्षांत ३७६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. गुणवंत पाच विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन त्यांचाही गौरव करण्यात येणार आहे. ग्रामीण विभागातील हे देशातील पहिले अभिमत विद्यापीठ आहे. विद्यापीठाने मागील शैक्षणिक वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावरील १९ विद्यपीठे व संस्थांशी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधनाचे करार केलेले आहेत. तसेच युरोपीय शिष्यवृत्ती कार्यक्रमात विद्यापीठाचा समावेश आहे. विद्यापीठात लिन्स पाम शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत निधी प्राप्त झाला असून, त्याचा वापर विद्यार्थी व शिक्षकांसाठी केला जात आहे. विद्यापीठाने सध्या कोरोलिन्स्का संस्थेबरोबर मधुमेह संशोधनात सहभाग घेतल्याचेही विखे व कुलगुरू दळवी यांनी या वेळी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा