वैद्यकीय क्षेत्राचे वेगाने होत असलेले व्यावसायीकरण व या उदात्त व्यवसायातील बाजारीकरणामुळे डॉक्टर्स टीकेचे लक्ष्य बनले असताना नागपुरातील काही डॉक्टरांनी आपत्तीत सापडलेल्या काश्मिरी बांधवांसाठी धावून जात आपल्यातील संवेदनशीलतेचे दर्शन घडविले आहे. पुरामुळे रोगराईचा सामना करीत असलेल्या सुमारे ४० हजार काश्मिरी रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून मदतीचा हात दिला.
झेलम नदीला गेल्या ७ सप्टेंबरला आलेल्या पुराचा तडाखा संपूर्ण काश्मिरला बसला. केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती घोषित केली व सैन्याने सुमारे १.२० लाख लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचविले. पहिले १० दिवस पावसाचे पाणी काढण्याचे काम झाल्यानंतर १९ सप्टेंबरला नागपुरातील काही डॉक्टरांनी काश्मिरी पूरग्रस्तांना आपल्या सेवा पुरविण्यासाठी स्वयंस्फूर्तीने तेथ्ेा जाण्याचा निर्णय घेतला. डॉ. सचिन जांभोरकर, डॉ. मृदुला बापट, डॉ. शैलजा देशपांडे, डॉ. प्रणाम सदावर्ते, डॉ. भाग्यश्री गोळे, डॉ. महेश चारोळकर यांच्यासह इतर डॉक्टर्स तसेच वैद्यकीय शिक्षण देणारे विद्यार्थी वेगवेगळया गटांमध्ये पूरग्रस्त काश्मिरात पोहोचले. श्रीनगरला पोहोचून तेथून त्यांनी ज्या ठिकाणी वैद्यकीय सेवा पुरवायची होती ती छोटी गावे गाठली व स्थानिक संपर्काच्या मदतीने तेथे वैद्यकीय सेवा शिबिरे सुरू केली.
पुरामुळे काश्मिरींचे प्रचंड प्रमाणात नुकसान तर झालेच, मात्र पुरानंतर रोगराई पसरण्याचर भीती निर्माण झाली होती. वैद्यकीय खर्चाकरितादेखील पुरेसे पैसे लोकांकडे नव्हते आणि खेडोपाडी तर आणखी कठीण परिस्थिती होती. एकेका आरोग्य शिबिरात दिवसाला हजारांच्यावर रुग्ण उपचार घ्यायला यायचे. कधी कधी तर एकाच वेळी ४००-५०० रुग्ण उपचार घेण्यासाठी आलेले असायचे.
या सगळयांना तपासायचे, औषधापचार करायचे व गरज पडल्यास त्यांचे समुपदेशनही करायचे अशी सगळी कामे या डॉक्टरांना करावी लागायची. १५ दिवसांच्या काळात या नागपूरकर डॉक्टरांच्या चमूने सुमारे ४०हजार रुग्ण तपासले.
‘सगळयात महत्त्वाचा प्रश्न हा सॅनेटरी नॅपकीन्सचा होता. आपत्तीच्या क्षणी या गोष्टीदेखील पुरवाव्या लागतात याचा कुणी विचारच करत नाही. शेवटी आम्ही डॉक्टरांनी मिळूनच स्वखर्चाने सॅनेटरी नॅपकीन्स विकत घेतले व त्यांचे वाटप केले. या शिबिरात काश्मिरी मुलेसुद्धा यायची. आम्ही त्यांना खेळ व गाणी शिकवायला सुरुवात केली. भारताबद्दल आकसाची भावना काश्मिरी नागरिकांमध्ये आहे, असे तिथे गेल्यावर कधी कधी जाणवते. अशा उपक्रमांमुळे कदाचित आपल्या व त्यांच्यातील भावबंध मजबूत होतील, अशी आशा वाटते,’ असे या चमूबरोबर गेलेले डॉ. सचिन जांभोरकर यांनी सांगितले.
काश्मीरमध्ये आरोग्यसेवा पुरवल्यानंतर येथेच न थांबता अधिकाधिक युवकांना या कामात जोडण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण घेणा-या युवकांना एकत्रित करून निरनिराळया सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग वाढावा या दृष्टीने ‘सेवांकुर’ या नावाने संघटना सुरू करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण घेता घेता एक आठवडा समाजाकरिता देण्याचे आवाहन सेवांकुरतर्फे करण्यात येते. ऐन आपत्तीच्या वेळी मदतीकरिता कार्यकर्ते व मदत गोळा करता यावी, याकरिता आता एक ‘डाटा बँक ’ तयार करण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या नावाने सुरू करण्यात येणाऱ्या या कामाची प्रमुख जबाबदारी डॉ. शैलजा देशपांडे यांच्याकडे राहणार आहे. जास्तीत जास्त वैद्यकीय विद्यार्थ्यांना या कामाशी जोडण्याचा आमचा मानस आहे, असे डॉ. जांभोरकर यांनी सांगितले.