डॉक्टरांनी पैशांपेक्षा रुग्णांचे अश्रू आनंदात कसे परावर्तित होऊ शकतील यासाठी काम केले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. अनंत पंढरे यांनी केले.
अभाविप पुरस्कृत वैद्यकीय शिक्षण विद्यार्थी परिषदेतर्फे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘नाडी परीक्षा.. रुग्णांची, समाजाची’ या राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. पंढरे बोलत होते. राज्याच्या विविध जिल्हय़ांतून अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक तसेच दंत महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘सामाजिक परिवर्तनामध्ये डॉक्टरांची भूमिका’ या विषयावर डॉ. आनंद फाटक म्हणाले, की रुग्ण हेच आपले गुरू आहेत, तेच आपल्याला शिकवतात. रुग्णांमध्ये उत्साहाने जगण्याची ऊर्मी डॉक्टरांनी निर्माण केली पाहिजे. ‘सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांशी संवाद’ या सत्रात डॉ. अश्विनीकुमार तुपकरी यांची मुलाखत घेण्यात आली. हेडगेवार रुग्णालयाच्या स्थापनेपासूनची सर्व माहिती व अनुभवाची शिदोरी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना उलगडून दाखवली. ठाणे जिल्हय़ातील जव्हार, मोखाडा या वनवासी भागात सामाजिक बदल करणाऱ्या डॉ. सुजीत निलेगावकर यांच्याशीही विद्यार्थ्यांनी संवाद साधला. ‘स्वामी विवेकानंदांची प्रासंगिकता’ या विषयावर प्रा. संजय गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. राजेश पांडे यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या समस्यांसंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सहभागी विद्यार्थ्यांसाठी प्रकल्पभेटीचे आयोजन करण्यात आले होते.
यात दत्ताजी भाले रक्तपेढी, डॉ. हेडगेवार रुग्णालय, लहुजी साळवे आरोग्य केंद्र व संत रोहिदास आरोग्य केंद्र हे प्रकल्प दाखवण्यात आले. समारोप सत्रात अभाविपचे क्षेत्रीय संघटनमंत्री संजय पाचपोर यांनी डॉक्टरांनी रुग्णांसहित समाजाची नाडी ओळखण्याचे आवाहन केले. ग्रामविकास, पाणी विषयात तसेच समाजसेवेत डॉक्टरांनी अग्रेसर राहावे, असेही ते म्हणाले. वैद्यकीय शिक्षण विद्यार्थी परिषदेचे प्रांत निमंत्रक डॉ. अमोल पाटील यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत परुळेकर यांनी केले.

Story img Loader