कोल्हापूरकरांच्या टोलबाबतच्या भावना आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पोहोचवू असा आश्वासन बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीला आज दिला. नेहमीप्रमाणे मंत्र्यांनी टोलची टोलवाटोलवी सुरूच ठेवली आहे.  दरम्यान, कोल्हापूरच्या दोन्ही मंत्र्यांनी तोंडावर बोट ठेवण्याचे काम नेहमीप्रमाणे चालू ठेवले आहे.
मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात आयोजित बठकीस कोल्हापूर जिल्हय़ाचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीत सहभागी आमदार, खासदार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकत्रे असे  ५५ जण उपस्थित होते.
कोणत्याही परिस्थितीत टोल देणार नाही, मग कोणताही तोडगा काढा, तो आम्हाला मान्य असेल असा आक्रमक पवित्रा घेत सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने आपली भूमिका स्पष्ट केली.   खासदार आवळे यांनी टोलला तीव्र विरोध दर्शवत प्रशासन आणि सरकारवर टीका केली, तर  मुंबईत आयोजित टोलची बठक म्हणजे एक फार्स होता अशी प्रतिक्रिया आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. कितीही अडथळे आले तरी चालतील. आम्ही लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी बठकीत ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील, श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज, महापौर प्रतिभा नाईकनवरे, खासदार राजू शेट्टी, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, आमदार सुरेश हळवणकर, आमदार के. पी. पाटील, निवास साळोखे, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई यांनी आपली मते मांडली.