वादग्रस्त ठरलेल्या झूम कचरा प्रकल्पाजवळ एका वासरावर रविवारी कुत्र्यांनी हल्ला करून त्यास जखमी केले. कुत्र्याने हल्ला केल्याने हा प्रकल्प पुन्हा चर्चेत आला. वासरू अर्धमेले होऊन तडफडत असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रविवारच्या सुट्टीकडे बोट दाखवित काही सोय करू शकत नाही, असे उत्तर देऊन आपल्या कर्तव्य तत्परतेचा अनुभव आणून दिला. वासराचे मालक निवृत्ती चौगुले यांनी शाहुपुरी पोलिसांना याची माहिती दिली आहे.     
शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करणारा झूम प्रकल्प या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतो. तेथे भटक्या कुत्र्यांचा वावरही मोठय़ा प्रमाणात आहे. २००५ साली रेश्मा रेड्डी या बालिकेचे कुत्र्यांनी लचके तोडल्याने ती मृत्युमुखी पडली होती. परिसरातील अनेक नागरिकांनाही कुत्र्यांनी चावा घेतल्याची उदाहरणे आहेत. याबाबतच्या असंख्य तक्रारी महापालिका व पोलीस दफ्तरी दाखल झाल्या आहेत. रविवारी पुन्हा एकदा याच प्रकाराची पुनरावृत्ती घडली. कदमवाडी-बावडा रस्ता येथे राहणारे निवृत्ती चौगुले यांच्या वासरावर सात ते आठ कुत्र्यांनी हल्ला चढविला. झूम प्रकल्पाच्या मागील बाजूस हा प्रकार घडला. सर्वच कुत्र्यांनी वासराच्या अंगावर झेप घेत त्याचे लचके तोडले. वासराच्या पोटातून रक्त वाहू लागल्याने ते जागीच तडफडत पडले होते. चौगुले व नागरिकांनी कुत्र्यांना हाकलून लावले. त्यानंतर चौगुले यांनी शाहुपुरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. महापालिकेचे आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी आज रविवार असल्याने काही सोय करू शकत नाही, असे उत्तर दिल्याचे नागरिकांनी सांगितले. पाटील यांच्या या वक्तव्यावर परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात होता. अशाप्रकारचा हल्ला लहान मुलांवर होण्याची भीतीही नागरिकांनी यावेळी बोलून दाखविली.

Story img Loader