दुष्काळी स्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्यातील अपूर्ण पाणी प्रकल्प पूर्ण करणे हाच एकमेव उपाय असून त्यासाठी केंद्र व राज्य शासन संयुक्त प्रयत्न करीत असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी सांगितले.
जत व सांगोला या दुष्काळी भागाचा पाहणी दौरा आटोपून जतमध्ये विविध विभागाच्या आढावा बठकीत श्री. पवार यांनी शासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. जत सारख्या अवर्षणग्रस्त भागाला म्हैसाळ योजनेचे पाणी नेणे हीच प्राथमिक जबाबदारी आहे. सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, सातारा जिल्ह्यातील खटाव, माण, दहीवडी, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा हा परिसर दुष्काळामुळे अविकसित राहिला.
म्हैसाळसह, ताकारी, टेंभू योजनेचे पाणी या भागाला मिळाले तरच येथील शेतीचा विकास होऊ शकतो. राज्यातील अपुरे जलसिंचन प्रकल्प पूर्ण करणे हेच शासनाचे प्राधान्याने धोरण आहे. यासाठी केंद्र शासन ३० हजार कोटी तर राज्य शासन ३० हजार कोटी खर्च करणार आहे.
राज्य शासनाने पशुधन वाचविण्यासाठी दुष्काळी भागात विविध ठिकाणी चारा छावण्या सुरू केल्या. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व भूमिहीन जनतेचा दुग्धव्यवसाय हा प्रमुख अर्थार्जनाचा व्यवसाय आहे. त्यामुळे पशुधन वाचविणे महत्त्वाचे होते. राज्य शासनाने चारा छावण्या सुरू केल्यामुळे १० लाख पशुधन वाचले आहे. राज्य शासनाने दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी चांगले काम केले असून केंद्र शासनाने अडीच हजार कोटींची मदत उपलब्ध करून दिली आहे.
या बठकीत आ. प्रकाश शेंडगे यांनी दुष्काळी भागातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याची मागणी केली. बठकीस ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यासह विलासराव जगताप, जिल्हाधिकारी, विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.
कृषिमंत्री पवार यांनी जत तालुक्यातील शेगाव, बनाळी व औंढी येथील चारा छावणीस भेट देऊन माहिती घेतली. आपला दौरा हा केवळ दुष्काळी भागातील सद्य स्थितीची पाहणी करणे व लोकांशी सुसंवाद साधणे यासाठीच होता असे त्यांनी सांगितले.
श्री. पवार यांना आटपाडी येथील पाहणी दौरा मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, स्थानिक पातळीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी टेंभूचे पाणी आल्याशिवाय मंत्र्यांना तालुका बंदी करण्याचे आंदोलन हाती घेतले आहे. त्यामुळे श्री. पवार यांचा दौरा रद्द केला की काय अशी शंका व्यक्त केली जात होती.
पाणी पुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे हे सांगोल्यापासून श्री. पवार यांच्या सोबत दौऱ्यात होते. शेगाव येथील चारा छावणीला भेट दिली. त्यावेळी त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याची माहिती मिळाली असावी त्यानंतर त्यांनी श्री. पवार यांचा दौरा अर्धवट सोडला.
कृषिमंत्री श्री. पवार यांचा मंगळवारी सांगलीत मुक्काम असून बुधवारी सकाळी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत वालचंद अभियांत्रिकी अभिमत महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा