महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १ डिसेंबरपासून दुपटीने पाणी दरवाढ केली असून डोंबिवली एमआयडीसीतील रहिवाशांना या दरवाढीचे पहिले देयक सोमवारपासून (ता. १३) वाटप करण्यात येणार आहेत. एवढी दरवाढ लागू करू नका, अशी पत्रे देऊनही त्याची दखल न घेतल्याने डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने नव्याने येणारी पाणी देयके न भरण्याचा इशारा ‘एमआयडीसी’ला दिला आहे.
डोंबिवली एमआयडीसीत पाचशे सोसायटय़ा, तीनशे बंगले व शंभरहून अधिक व्यापारी गाळे आहेत. या संकुलांमध्ये सुमारे ३० हजार रहिवासी राहतात. या रहिवाशांना पाणी दरवाढीचा फटका बसणार आहे. महावितरणचा वीज दरवाढ, देखभालीचा खर्च
वाढल्याने एमआयडीसीने १ डिसेंबरपासून पाणी दर ८ रुपये ५० पैशावरून थेट १४ रुपये २५ पैसे केला आहे. ज्या रहिवाशांना दरमहा पाचशे ते सहाशे रुपये पाणी देयक येत होते. त्यांना एक हजार ते बाराशे रुपये पाणी देयक भरणा करावा लागणार आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात होणारी पाणी दरवाढ गृहीत धरून एमआयडीसीतील अनेक सोसायटींनी आपल्या देखभाल, दुरुस्ती खर्चात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाणी दरवाढीची माहिती मिळताच डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे राजू नलावडे, रश्मी येवले, सुधीर महाजन, जगन्नाथ गवाळे यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी दरवाढ कमी करण्याची मागणी केली होती. अधिकाऱ्यांनी याविषयी वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन दिले होते. एमआयडीसी पाण्याचे दर तीन ते चार रुपयांनी कमी करण्याची चर्चा सुरू असतानाच वाढीव पाणी देयके पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एमआयडीसीमध्ये पाणी देयक भरू नका म्हणून सर्वत्र फलक लावण्यात आले आहेत. देयक न भरल्याने पाणीपुरवठा बंद केला तर रहिवासी उग्र आंदोलन करतील, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे. पाणी देयक कमी करण्याचा अधिकार महामंडळाला आहे. याविषयी निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे एमआयडीसी अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, डोंबिवली, भिवंडी, पाताळगंगा, टीटीसी, अंबरनाथ औद्योगिक विभागाचा पाणी दर २९ रुपये ५० पैसे करण्यात आला आहे.
पालिकेला दिलासा
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या वाटणीचे १०० दशलक्ष लिटर पाणी एमआयडीसी उल्हास नदीतून उचलते. ते एमआयडीसीकडून न घेता थेट शासनाच्या लघू पाटबंधारे विभागाशी करार करून उचलण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या वाढीव कराचा पालिका हद्दीतील जनतेवर बोजा पडणार नाही. दरवर्षी पाणीबिलापोटी पालिका एमआयडीसीला सुमारे दोन ते अडीच कोटीपर्यंत देयक अदा करते. एमआयडीसी पाणीपुरवठा करीत असलेल्या सर्व पालिका, नगरपालिकांमधील पाण्याचे दर १४ रुपये ५० पैसे ते १५ रुपये ५० पैसे करण्यात आले आहेत. यापूर्वी हे दर ८ ते ९ रुपयांच्या दरम्यान होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा