कचरा, प्रदूषणाने हैराण झालेल्या डोंबिवली एमआयडीसीतील रहिवाशांनी आता शहराच्या प्रवेशद्वारावरील नंदी पॅलेस हॉटेलजवळील मोकळ्या भूखंडावर जाळण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. या भूखंडावर ग्रामपंचायतींकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यात औद्योगिक व रुग्णालयातील टाकाऊ कचरा फेकण्यात येऊन त्यास आगी लावण्यात येत आहेत. या सततच्या धुरामुळे ‘एमआयडीसी’ परिसरातील रहिवासी विविध व्याधीने हैराण झाले आहेत. तातडीने हे अनधिकृत कचरा क्षेपण बंद करावे म्हणून रहिवाशांनी शुक्रवारी ‘एमआयडीसी’ कार्यालयावर मोर्चा काढला.
‘अस्तित्व’ शाळेसमोरील अनधिकृत कचरा क्षेपण केंद्र बंद करण्यात आल्यामुळे परिसरातील ग्रामपंचायती गावातील कचरा या मोकळ्या भूखंडावर आणून टाकत आहेत.
त्या ठिकाणी काही कंपन्या, रुग्णालयांकडून टाकाऊ फेकला जातो. या कचऱ्यांना आगी लावण्यात येत असल्याने दिवस-रात्र या ठिकाणी धुराचे लोट पसरतात. हा धूर आरोग्यास घातक असल्याने या भागातील रहिवासी विविध व्याधीने हैराण आहेत.
देशात स्वच्छ भारत अभियान सुरू असताना एमआयडीसीत मात्र उघडय़ावर कचरा टाकून नागरिकांचे आरोग्य बिघडवले जात आहे. याचा निषेध व तातडीने हे कचरा क्षेपण बंद करण्याची मागणी करण्यासाठी एमआयडीसीतील कचरा निर्मूलन संघर्ष समितीचे ज्योती अय्यर, निखिल भोईर, राजू नलावडे, भालचंद्र म्हात्रे, विवेक देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
अनेक रहिवासी या मोर्चात सहभागी झाले होते. नंदी हॉटेलजवळील अनधिकृत क्षेपण केंद्र बंद करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा