मागील दोन वर्षांपासून फेरीवाल्यांच्या विळख्यातून डोंबिवलीकर मुक्त झाले होते; परंतु आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी गेल्या पाच दिवसांपूर्वी फेरीवाला हटाव मोहिमेतील सर्व पथकप्रमुखांच्या तडकाफडकी कल्याण येथे बदल्या केल्याने फेरीवाल्यांना पुन्हा मोकळे रान मिळाले आहे.
डोंबिवली पूर्वेतील फेरीवाला हटाव मोहिमेचे पथकप्रमुख दिलीप भंडारी यांच्याविरुद्ध नगरसेविका कोमल निग्रे यांनी फेरीवाल्यांकडून अनधिकृत पावत्या फाडल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. भंडारी यांच्यामुळे पालिकेची होणारी बदनामी टाळण्यासाठी आयुक्तांनी पूर्व आणि पश्चिम भागातील सर्वच पथकप्रमुखांच्या बदल्या केल्या आहेत. डोंबिवली पश्चिमेत बाजीराव अहिर, प्रकाश म्हात्रे यांच्या पथकाने गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ मेहनत घेऊन दीनदयाळ रोड, गुप्ते, महात्मा फुले रोड, महात्मा गांधी रोडवरील फेरीवाले हटविण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे कौतुक करण्याऐवजी आयुक्त सोनवणे यांनी भंडारी यांच्या चुकीसाठी अन्य तत्पर, प्रामाणिक कर्मचाऱ्यांची बदली करून डोंबिवलीकरांना पुन्हा फेरीवाल्यांच्या विळख्यात लोटले असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. आता फेरीवाले हटविण्याची सर्व जबाबदारी ग, फ आणि ह प्रभागांच्या प्रभाग अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. ग प्रभागातील लिपिक राजेंद्र साळुंखे यांना गेल्या दोन वर्षांपासून फेरीवाला हटाव मोहिमेतून दूर केल्यावर फेरीवाल्यांची वतनदारी नवीन पथकाने मोडीत काढली होती. साळुंखे यांच्याविषयी पालिकेत अनेक तक्रारी आहेत. त्यांना एका वजनदार लोकप्रतिनिधीचा ‘आशीर्वाद’ असल्याने ते ग प्रभागात ठाण मांडून असल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे. पूर्व भागातील इंदिरा चौकातील सीडी विक्रेते, मधुबन सिनेमाजवळील रस विक्रेते, चप्पल व इतर किरकोळ विक्रेत्यांनी पुन्हा ग प्रभागाच्या आशीर्वादाने आपले व्यवसाय हळूहळू सुरू करण्यास प्रारंभ केला असल्याचे सांगण्यात येते. आता याबाबत प्रभाग समित्या काय निर्णय घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
रेल्वे पुलांवर रेल्वे पोलिसांच्या देखत फेरीवाले सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत बसलेले असतात, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई आरपीएफ व रेल्वे पोलिसांकडून करण्यात येत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा