डोंबिवली रेल्वेस्थानकातील अनेक समस्यांमुळे प्रवासी अक्षरश: हैराण झाले असून प्रसाधनगृहातील दरुगधी, फलाटांची अनियमित उंची, बंद असणाऱ्या तिकीट खिडक्या आणि सीव्हीएम-एटीव्हीएम कूपन मशीन, फेरीवाल्यांचे अतिक्रमण अशा अनेक समस्या ही डोंबिवलीकरांची रोजची डोकदुखी बनली आहे. रेल्वे प्रशासनाला कोटय़वधी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या दुर्दशेकडे त्वरित लक्ष देऊन सुधारणा केल्या जाव्यात अशी मागणी संतप्त प्रवासी करत आहेत.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील समस्या आजही कायम आहेत. फलाट क्रमांक पाच आणि एकची उंची कमी असल्याने गाडीत चढताना प्रवाशांना कसरत करावी लागते. आधी फलाट क्रमांक तीन व चारच्या बाबतीतही अशीच परिस्थिती होती. प्रवाशांनी ओरडा केल्यानंतर हे काम तातडीने करण्यात आले. स्थानकातील बंद तिकीट खिडक्यांमुळे प्रवाशांच्या लागणाऱ्या लांबलचक रांगा हे तर रोजचे चित्र आहे.
स्थानकाच्या पूर्व भागात रामनगर दिशेकडील ४ ते ५ तिकीट खिडक्यांपैकी केवळ दोन खिडक्याच कायम चालू असतात. विष्णुनगर, दीनदयाळ चौक भागातील तिकीट खिडकीवरही निम्म्या खिडक्या बंद असतात. फलाटांवर १० ते १२ एटीव्हीएम मशीन बसविण्यात आलेले आहेत. या मशीन्सचा वापर करण्याबाबत अनेक प्रवाशांना माहिती नसते. यासाठी येथे एजंटची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु गर्दीच्या वेळी हे एजंट उपस्थित नसल्याची तक्रार अनेक प्रवशांनी व्यक्त केली.
यातील अनेक मशीन बंद अवस्थेत असल्याने येथील प्रवाशांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भागात असलेल्या प्रसाधनगृहांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याचे एका प्रवाशाने सांगितले. यामुळे स्थानकात प्रवेश करताना प्रसाधनगृहातील दुर्गंधीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. येथील फेरीवाले स्थानकाच्या परिसरातच कचरा टाकत असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पाटकर रोड ते रामनगर तिकीट खिडकीपर्यंतच्या परिसराला फेरीवाल्यांनी कचरा टाकण्याचे ठिकाण बनविले आहे. फेरीवाल्यांविरोधात वारंवार तक्रारी करूनही कोणतीच कारवाई केली जात नसल्याचे अनेक प्रवाशांनी सांगितले.
विष्णुनगर भागात रेल्वे पोलीस ठाण्याला लागून असलेला पादचारी जिना समोरच्या गाळ्यांमुळे बंदिस्त ठेवण्यात आला आहे. या गाळ्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यांच्यावर कारवाई करता येत नसल्याचे रेल्वे सूत्रांचे म्हणणे आहे. हा जिना सुरू केल्यास विष्णुनगर जिन्यावर होणारी प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होईल असे प्रवाशांचे म्हणणे आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या सफाईसाठी खासगी यंत्रणा नेमण्यात आली आहे. परंतु ही साफसफाई फक्त फलाट आणि जिन्यांपुरतीच केली जाते. निवडणुकांच्या तोंडावर रेल्वे स्थानकांना भेटी देऊन आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्याचा विसर पडला की काय? असा सवाल संतप्त प्रवासी करत आहे.
डोंबिवली रेल्वेस्थानकाला समस्यांचा विळखा
डोंबिवली रेल्वेस्थानकातील अनेक समस्यांमुळे प्रवासी अक्षरश: हैराण झाले असून प्रसाधनगृहातील दरुगधी, फलाटांची अनियमित उंची, बंद असणाऱ्या तिकीट खिडक्या आणि सीव्हीएम-एटीव्हीएम कूपन मशीन, फेरीवाल्यांचे अतिक्रमण अशा अनेक समस्या ही डोंबिवलीकरांची रोजची डोकदुखी बनली आहे.
First published on: 16-02-2013 at 03:02 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivali railway station under problems