समाजप्रबोधनाचे नवे व्यासपीठ
अंधश्रद्धा, खड्डे, स्त्री-भ्रूण हत्या या विषयांवर भाष्य
स्पर्धकांच्या सळसळत्या उत्साहात ठाणेकरही सहभागी
फुगडी.. बस फुगडी. तवा फुगडी. भिंगरी फुगडी. आगोटा-पागोटा.. साळुंकी.. गाठोडे.. लाटा बाई लाटा.. घोडा हाट.. करवंटी झिम्मा.. टिपऱ्या.. गोफ.. सासू-सून भांडण.. अडवळ घुम पडवळ घुम.. सवतीचे भांडण. दिंड घोडा.. असे पारंपरिक खेळ आणि समाज जागृतीपर मंगळागौर गाण्यांनी ठाण्याच्या टिपटॉप प्लाझाचे सभागृह दुमदुमून गेले होते. ‘झी’ वाहिनी आयोजित आणि ‘लोकसत्ता’च्या सहकार्याने केसरी प्रस्तुत ‘चला खेळूया मंगळागौर’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या मंगळागौर मंडळांनी अतिशय उत्साही आणि जल्लोषपूर्ण सादरीकरण केले. डोंबिवलीच्या ‘योगसखी’ मंडळाने वैविध्यपूर्ण सादरीकरणामुळे पहिला क्रमांक पटकाविला, तर रत्नागिरीच्या दुर्गादेवी मंडळाने उपविजेते पदावर मोहोर उमटवली. तृतीय क्रमांक नागपूर येथील स्वरमोहर मंडळाला मिळाला. तर नाशिकच्या तरुणींच्या आकृती मंडळाने आपल्या भरगच्च सादरीकरणामुळे परीक्षकांच्या पसंतीचे विशेष पारितोषिक जिंकले.
प्रतिनिधी, ठाणे
 फुगडी.. बस फुगडी. तवा फुगडी. भिंगरी फुगडी. आगोटा-पागोटा.. साळुंकी.. गाठोडे.. लाटा बाई लाटा.. घोडा हाट.. करवंटी झिम्मा.. टिपऱ्या.. गोफ.. सासू-सून भांडण.. अडवळ घुम पडवळ घुम.. सवतीचे भांडण. दिंड घोडा.. असे पारंपरिक खेळ आणि समाज जागृतीपर मंगळागौर गाण्यांनी ठाण्याच्या टिपटॉप प्लाझाचे सभागृह दुमदुमून गेले होते. ‘झी’ वाहिनी आयोजित आणि ‘लोकसत्ता’च्या सहकार्याने केसरी प्रस्तुत ‘चला खेळूया मंगळागौर’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या मंगळागौर मंडळांनी अतिशय उत्साही आणि जल्लोषपूर्ण सादरीकरण केले. डोंबिवलीच्या ‘योगसखी’ मंडळाने वैविध्यपूर्ण सादरीकरणामुळे पहिला क्रमांक पटकाविला, तर रत्नागिरीच्या दुर्गादेवी मंडळाने उपविजेते पदावर मोहोर उमटवली. तृतीय क्रमांक नागपूर येथील स्वरमोहर मंडळाला मिळाला. तर नाशिकच्या तरुणींच्या आकृती मंडळाने आपल्या भरगच्च सादरीकरणामुळे परीक्षकांच्या पसंतीचे विशेष पारितोषिकजिंकले.
श्रावण महिन्यात नववधूसाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या पारंपरिक मंगळागौर कार्यक्रमास स्पर्धेचे स्वरूप दिल्याने यानिमित्ताने दर्जेदार आणि समाज प्रबोधनपर कार्यक्रमाची मेजवारी शनिवारी ठाणेकरांना लुटता आली. महिलांचे आहार, आरोग्य आणि मनोरंजनापुरते मर्यादित न राहता या खेळाने समाज प्रबोधनाचे नवे व्यासपीठ निर्माण केल्याचे यानिमित्ताने दिसून आले. मंगळागौरीची गाणी, निरनिराळे खेळ, खास ठसकेबाज उखाणे, टाळ्यांवर धरलेला नृत्याचा ठेका, फुगडय़ांचे विविध प्रकार यांचे सादरीकरण करताना भ्रष्टाचार, महागाई, दहशतवाद, स्त्री-भ्रूण हत्या, निरक्षरता, दलाली, खड्डे, हुंडाबळी, अंधश्रद्धा, वृक्षारोपण अशा वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करत समाज प्रबोधनपर संदेश देण्याबरोबरच सद्यस्थितीवर टिप्पणी करण्याचा अनोखा प्रयत्न मंगळागौरीच्या या स्पर्धेतून स्पर्धकांनी केला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातून निवडलेली आठ मंडळे आली होती.
प्रेक्षकांनी खच्चून भरलेल्या सभागृहामध्ये भक्ती देशपांडेच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डोंबिवलीचे योगसखी, नाशिकचे चंडिकामाता, नागपूरचे स्वरमोहर, पिंपरी चिंचवडचे इंद्रायणी, कोल्हापूरचे शारदा, रत्नागिरीचे दुर्गादेवी, अहमदनगरचा मंगलग्रुप आणि नाशिकच्या आकृती या मंगळागौर मंडळांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात ही स्पर्धा रंगली होती. सगळ्यांची तयारी जय्यत होती आणि त्याचे परीक्षण करण्यासाठी तितकेच लोकप्रिय परीक्षकदेखील कार्यक्रमास लाभले होते. ‘एकापेक्षा एक अप्सरा’फेम मानसी नाईक, नेहा शितोळे, सुप्रिया पाठारे, संकर्षण कऱ्हाडे आणि भाऊ कदम अशी झी मराठी वाहिनी परिवारातील कलाकारांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. त्यांनीदेखील स्पर्धेदरम्यान स्पर्धकांसह फुगडीचा आणि मंगळागौरीचा आनंद लुटला; तर केसरी टूर्सचे केसरी पाटील, त्यांच्या पत्नी सुनीता पाटील, मोहन ग्रुपचे प्रदीप इंगवले, टिपटॉप प्लाझाचे रोहित शहा, शामराव विठ्ठल बँकेच्या प्रतिनिधी या वेळी उपस्थित होत्या.
डोंबिवलीच्या योगसखी मंडळाने भारतातील विविध समस्या आणि मंगळागौरीची पारंपरिक गाणी यांचा अतिशय चपखल पद्धतीने मिलाफ करून उत्तम सादरीकरण केले होते. अत्यंत लयबद्ध सादरीकरणामुळे आणि समाजातील वाईट चालीरीतींवर प्रहार करून योगसखी मंडळाने कार्यक्रम एका वेगळ्या उंचीला नेला. त्यानंतर नाशिकच्या चंडिकामाता मंडळानेही समाज जागरणाचा उत्तम प्रयत्न केला. कोल्हापूरच्या शारदा गटामधील ७५ वर्षीय आजींनी तर उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच दिला. तर रत्नागिरीच्या एका शाळेच्या शिक्षक आणि पालकांनी स्थापन केलेल्या दुर्गादेवी मंडळाने आपल्या उत्साही सादरीकरणाने उपस्थितांची मोठी दाद मिळवली. त्यांच्यासोबत आलेल्या दोन छोटय़ा ढोलकी वादकांनी तर उपस्थितांची मने जिंकली. नाशिकचे आकृती मंडळ वैशिष्टय़पूर्ण ठरले, कारण या गटातील एकाही मुलीचे लग्न झालेले नसतानादेखील त्यांनी मंगळागौरीचे सादरीकरण अधिक चपखलपणे केले. या वेळी उखाणे स्पर्धादेखील घेण्यात आली. त्यात शोभा पुजारी, विदुला ठुसे आणि विद्या देवरे यांनी विजेतेपद मिळविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा