अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात असलेल्या डोंबिवली ‘एमआयडीसी’ला आता टपऱ्यांचा विळखा पडू लागला आहे. रस्त्याच्या दुतर्फा या टपऱ्या उभारण्यात येत आहेत. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या संगनमतामधून या टपऱ्या बांधण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. घरडा सर्कल, एमआयडीसी कार्यालय, मिलापनगर, सुदर्शननगर, सोनाटा चौक, कावेरी (ममता) चौक या भागांतील रस्त्याच्या दुतर्फा रात्रीच्या वेळेत तयार केलेली लाकडी, लोखंडी टपरी आणून ठेवली जाते. काही टपऱ्यांवर अपंग स्टॉल नावाचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात या टपऱ्यांमध्ये डोळस माणसे व्यवसाय करताना दिसतात. एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर या टपऱ्या उभारण्यात येत असताना अधिकारी या अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई का करीत नाहीत, असे प्रश्न या भागांतील रहिवाशांकडून करण्यात येत आहेत. सोनाटा, ममता चौकात शाळा, रुग्णालये, रिक्षा वाहनतळ आहेत. त्यामध्ये या टपऱ्यांची भर पडल्याने शाळेच्या बस, रिक्षांमुळे या भागात सतत वाहतूक कोंडी होते. शाळेची लहान मुले या भागातून येजा करतात. पालकांची चिंता या प्रकारामुळे वाढली आहे.
ममता चौकात एक मंदिर तयार करून त्याच्या चोहोबाजूंनी लोखंडी जाळी लावण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील रिक्षाचालकांना रिक्षा उभ्या करणे अवघड झाले आहे. घरडा सर्कल रस्ता परिसरात ३० ते ४० हातागाडय़ा विविध प्रकारच्या खाद्योपयोगी वस्तूंची उघडय़ावर विक्री करीत आहेत. रस्त्यावरील व्यापारी गाळे अनधिकृतपणे दुमजली, तीन मजली करण्यात येत आहेत. या गंभीर विषयाकडे एमआयडीसी, ग्रामपंचायतीचे लक्ष नसल्याने रहिवासी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

Story img Loader