बहुतेक विद्यार्थ्यांना अवघड आणि कठीण वाटणारा क्रमिक अभ्यासक्रमातला गणित विषय सोपा करून शिकविण्याची अभिनव पद्धत डोंबिवलीतील एक ज्येष्ठ नागरिक आनंदकुमार गोरे यांनी शोधली आहे. आनंदकुमार यांची आई ठाण्याच्या मो. ह. विद्यालयात शिक्षिका तर वडिल रेल्वेत होते. आई-वडिलांकडून आपल्यावर गणिताचे चांगले संस्कार झाले असे मानणाऱ्या आनंदकुमार यांनी कॅनरा बँकेतून १९९० मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर नव्या पिढीवर हे संस्कार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी शहरातील गणितप्रेमी मंडळींना एकत्र करून शुभंकरोती गणितप्रेमी मंडळाची स्थापना केली. १९९८ पासून डोंबिवलीत ते शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणित शिकवित आहेत.गणित विषयाचे नीट आकलन व्हायचे असेल, तर तो आधी नीट समजून घ्यायला हवा, असे गोरे यांचे मत आहे. सध्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना ते गणिताची मैत्री करण्याबाबतचे खास प्रशिक्षण देतात. मराठी तसेच इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांतील विद्यार्थी या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेऊ शकतात. शाळा, खासगी शिकवणी वर्ग, सोसायटय़ांमध्ये हे वर्ग घेतले जातात. प्रवासखर्चा व्यतिरिक्त ते कोणतेही मानधन घेत नाहीत. पाचवी ते दहावीचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना गणित शिकविण्याच्या पद्धतीविषयी सविस्तर माहिती देणारे उपयुक्त डोंबिवली पॅटर्न हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. संपर्क-०२५१/२८८३५८३
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा